कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : पुण्याचं जम्बो कोविड सेंटर चालवणाऱ्या लाईफ लाईन संस्थेकडून हे काम काढून घेण्यात आलंय. याच सेंटरमधल्या ढिसाळ नियोजनामुळं पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला... या जम्बो सेंटरमध्ये रुग्णांचे कसे जम्बो हाल होत होते, याचा पंचनामा झी २४ तासने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठा गाजावाजा करून राज्य सरकारनं हे जम्बो कोविड सेंटर सुरू केलं. निविदा प्रक्रिया राबवण्यापासून कोणत्या सुविधा कोण देणार याचा निर्णय पी एम आर डी ए ने घेतला. कोणताही अनुभव नसताना या सेंटरची जबाबदारी लाईफ लाईन संस्थेकडे देण्यात आली. अप्रशिक्षित कर्मचारी, ऑक्सिजन बेडची कमतरता अशा अनेक समस्यांमुळं पांडुरंग रायकर आणि इतर रुग्णांना प्राण गमवावे लागले. लाईफलाईनला हे काम कुणी दिलं, याची चौकशी करण्याची मागणी आता केली जातेय.


पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर सरकारनं जी चौकशी समिती नेमली, त्या समितीचा अहवाल झी २४ तासच्या हाती आला आहे. या अहवालात असुविधांचा पाढाच वाचण्यात आला. शिवाय पीएमआरडीए आणि विभागीय आयुक्त कार्यालयावरही ताशेरे ओढण्यात आलेत.


जम्बो कोविड सेंटरचा पंचनामा 


८०० खाटांची क्षमता असताना प्रत्यक्षात रुग्ण २५२ रुग्ण होते


तिथे वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नव्हते


कार्यरत डॉक्टरांना ३ वर्षांपेक्षा कमी अनुभव होता


डॉक्टरांची कामं परिचारिका आणि मुलंच करत होती


औषधं, वैद्यकीय सुविधांबाबत माहिती दिली जात नव्हती


सेंटरमध्ये स्वच्छता नव्हती, वैद्यकीय उपकरणं विखुरलेली होती


रुग्णांच्या नोंदी, फाईल, वैद्यकीय अहवाल गहाळ होते


एक्स रे मशीन कार्यरत नव्हती


८०० खाटांच्या मागे एकच कार्डियाक अँबुलन्स तैनात होती


गेटवर बाउन्सर तैनात केल्यानं भीतीचं वातावरण होते, अशा धक्कादायक बाबी चौकशीत समोर आल्या. याप्रकरणी पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं केली आहे. मात्र पीएमआरडीएनं याबाबत कसलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळंच रुग्णांचे मृत्यू झाले. त्याची जबाबदारी पीएमआरडीएला झटकता येणार नाही.