मोठी बातमी! अखेर `या` मार्गावरील लोकल पुन्हा रुळावर
पाहा कोणाला होणार याचा फायदा....
मुंबई : राज्य शासनानं लागू केलेल्या आदेशांनुसार फक्त अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी पुणे ते लोणावळा या मार्गावरील प्रवासासाठी उपनगरीय रेल्वे सेवा १२ ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या लोकल नेमक्या कोणत्या वेळेत धावतील त्याबाबतची सूचना कालांतरानं प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
लोकल सुरु करण्याच्या या प्रक्रियेकरता राज्य शासनातर्फे पुण्यातील पोलीस आयुक्तांना अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारीवर्गासाठी ओळखपत्रांची व्यवस्था करण्याचं काम सोपवण्यात आलं आहे. शिवाय या प्रक्रियेसाठी नोडल ऑफिसरही ठरवण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त किंवा त्यांच्याकडून निवड करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून ही ओळखपत्र पुरवण्यात येणार आहेत. क्यूआर कोडवर ही ओळखपत्र आधारलेली असतील. रेल्वे स्थानकात प्रवेश करतेवेळी हे क्यूआर ओळखपत्र दाखवल्यानंतर सदर व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रेल्वे स्थानकामध्ये ये- जा करणाऱ्यांची थर्मल स्क्रिनिंग केली जाणार आहे. शिवाय स्थानकात ये- जा करण्यासाठीच्या मार्गाचीही निश्चिती करण्यात येणार आहे. ज्यासाठी दिशादर्शक फलकांचा वापर होणार आहे. इतकंच नव्हे, तर प्रत्येक फेरीनंतर रेव्ले गाडीचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनापासून आरोग्य यंत्रणांपर्यंत सर्वजण या लोकल सेवा पूर्ववत आणण्यासाठी सावधगिरी बाळगतच सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट होत आहे.