अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यात एका रिक्षात एक आजोबा बसतात. रिक्षाचे होतात ३८ रुपये. आजोबा चाळीस रुपये देतात. रिक्षावाला सांगतो परत द्यायला दोन रुपये सुट्टे नाहीयत. मग ते पुणेकर आजोबा म्हणतात, चाळीस रुपये होईपर्यंत रिक्षा फिरवत राहा. हा जोक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता यापेक्षाही एक मोठ्ठा जोक पुणे महापालिकेनं केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसाला रिक्षा फिरवली तर जास्तीत जास्त १ हजार रुपये मिळतात, असं पुण्यातले रिक्षावाले सांगतात. आता नीट हिशेब करूया. एक रिक्षा महिनाभर वापरली तर ३० हजार रुपये द्यावे लागतील. १० रिक्षांचे झाले ३ लाख रुपये ; आणि ४ महिन्यांसाठी मिळून होतील १२ लाख रुपये. असं असताना महापालिकेनं त्यासाठी तब्बल ३८ लाख रुपये मोजले आहेत.


थकीत मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिकेनं अभय योजना राबवली होती. या योजनेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी रिक्षांवर भोंगा लावून प्रचार केला गेला. मात्र हा प्रचार इतका महागात पडल्याचं ऐकून आता धक्काच बसलाय.


मोटार वाहन विभागानं सादर केलेल्या बिलावर महापालिकेच्या मिळकत कर विभागानं आक्षेप घेतला होता. असं असताना मोटार वाहन विभाकडून त्याची कार्यवाही झाली. आज मात्र त्याबाबत लपवाछपवी सुरु आहे. 


महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. तब्बल ३८ लाख मी़टर होईल, एवढी रिक्षा गरागरा कुठे फिरवली, त्यातून खरंच ती अभय योजना पुणेकरांपर्यंत पोहोचली का, या सगळ्याची आता चौकशी सुरू आहे. आता या अभय योजनेचे खरे लाभार्थी थोड्याच दिवसांत कळतील.