Pune Metro: मुंबईनंतर आता पुणे शहरातही मेट्रो सेवेचा (Pune Metro News) विस्तार होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो प्रकल्पांची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते. मात्र, 1 ऑगस्टपासून फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक या मार्गावर मेट्रो सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. मेट्रोच्या प्रवाशांसाठी खास सवलतही देण्यात येणार आहे. (Pune Metro Ticket Price)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक हे एकूण 13 किलोमीटरच्या विस्तारिक मार्गाचे काम पूर्ण पूर्ण झाले असून 1 ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यासाठी यशस्वी चाचणी झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 12.30 च्या दरम्यान या मार्गाचे उद्घाटन होणार असून दुपारी तीन वाजल्यापासून मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. 


मेट्रोतून प्रवाशांची संख्या वाढावी तसेत लोकांपर्यंत मेट्रोची सेवा पोहचावी याबाबत महमेट्रो प्रयत्नशील आहे. म्हणूनच सामान्यांना तिकिटाच्या किंमती परवडाव्यात आणि विद्यार्थ्यांनाही मेट्रोतून प्रवास करता यावा, यासाठी तिकिट दरांत सूट देण्यात आली आहे, असं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 


मेट्रोतून प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. तसंच, इतर नागरिकांना शनिवारी आणि रविवारीही खास सवलत मिळणार आहे. मेट्रोचे तिकिट किती असेल याबाबतही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या तिकिटाचे दर 10 ते 30 रुपयांपर्यंत आहेत. तर, दहा मिनिटांना मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध असती. पण कमी गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावेल. सध्या प्रवाशांच्या सेवेत 13 मेट्रो आहेत. तर, सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत मेट्रोची सेवा सुरु राहणार आहे. 


या स्थानकांवर थांबेल मेट्रो


 गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानक


स्थानके-  गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महापालिका, जिल्हा न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल


फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय


फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय