पुणेः 1 ऑगस्टपासून पुणे मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुणे मेट्रो 1 टप्प्याचे कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिकपर्यंत आता मेट्रो धावणार आहे. मंगळवारी दुपारी 12.45 वाजता पंतप्रधान मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे मेट्रोची 2016मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी झाली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानकापर्यंत हे मार्ग सुरु होतेय. मात्र आता मेट्रोच्या विस्ताराचे काम पूर्ण झाले असून  पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मेट्रो स्थानकांना खास मराठमोळा व पुणेरी टच देण्यात आला आहे. 


1 ऑगस्टपासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत, 'या' प्रवाशांना तिकिट दरात मिळणार 30 % सूट, अशी असतील स्थानके


मेट्रो रेल्वे मार्गावरील काही स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत करण्यात आली आहे.  छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांची रचना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी परिधान केलेल्या पगडी सारखी म्हणजेच ज्याला 'मावळा पगडी' देखील म्हटले जाते, या सारखी आहे. शिवाजी नगर भूमिगत मेट्रो स्थानकाची एक विशिष्ट रचना आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची आठवण करून देते. त्याचबरोबर आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाणी न्यायालय मेट्रो स्थानक. हे देशातील सर्वात खोलवर असलेल्या मेट्रो स्थानकांपैकी पैकी एक आहे, ज्याचा सर्वात खोल बिंदू 33.1 मीटर आहे. सूर्यप्रकाश थेट फलाटावर पडेल अशा पद्धतीने या स्थानकाचे छत बनवण्यात आले आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराी सुरुवात टिळक स्मारक संस्थेने 1983 मध्ये केली होती. देशाची प्रगती आणि विकास यासाठी कार्य केलेल्या तसेच त्या बाबतीत उल्लेखनीय आणि विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्टला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पंतप्रधान मोदी या पुरस्काराचे 41 वे मानकरी असतील. हा पुरस्कार मिळालेल्या दिगजांमध्ये डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर नारायण मूर्ती, डॉ. ई‌. श्रीधरन या व्यक्तींचा समावेश आहे. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल.