निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : पुण्याहून (Pune News) भोर वरंध घाटमार्गे (varandha ghat) रायगडला निघालेली कार रस्ता चुकली आणि 40 फूट खोल दरीत पडून अपघात झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कुडली खुर्द‌‌‌ गावाजवळ रात्रीचा काळोख आणि धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी 40 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. गाडीतील तिघेही प्रवासी सुखरुप आहेत. हा दुर्गम भाग असल्यामुळे गाडी रस्त्यावर आणण्यासाठी जेसीबी, क्रेनची सोय उपलब्ध नव्हती. शेवटी सर्व कुडली ग्रामस्थांनी कार बाहेर काढली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोर मार्गे महाडकडे जाणारी चारचाकी गाडी रात्रीच्या वेळी रस्ता चुकली होती. हिर्डोशी मार्गे जाण्याऐवजी निगुडघर येथून नीरा देवघर रिंगरोड मार्गे धरणाला वळसा घेऊन निघालेल्या कारचा कुडली खुर्द‌‌‌ गावाजवळ अपघात झाला. रात्रीची वेळ आणि त्यातच धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी 40 फूट खोल दरीत गेली. सुदैवाने गाडीतील तिघेही सुखरुप आहेत.


भोर मार्गे कोकणात जाणारा नजीकचा मार्ग असल्याने या मार्गे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यात या मार्गावर चोरी,लुटमारीच्या घटना घडत नसल्याने प्रवाशी रात्रीचाही प्रवास करत असतात. असेच एक चारचाकी वाहन (एम एच 12 एफ वाय 5809) शुक्रवारी रात्री रायगडला जायला निघाले होते. पण दिशादर्शक फलक नसल्याने चालकाने गाडी निगुडघर (ता.भोर) येथून सरळ महाडकडे न नेता देवघर धरण रिंगरोडकडे वळवली. त्यामुळे गाडी रायरी, परहर, गुढे, कुडली मार्गे जात असताना पुन्हा महाडकडे जाणाऱ्या रस्त्याऐवजी चुकुन कुडली खुर्द गावात जाणाऱ्या रस्त्याकडे वळाली. 


गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने जाताना अरुंद रस्ता आणि धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी गावाजवळच 40 फुट खोल दरीत गेली. सुदैवाने गाडीत चालकासह असणारे तिघेही बचावले आहेत. ही घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली. गाडी पडल्याच्या आवाजाने काही ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचून गाडीतील प्रवाशी सुखरुप असल्याची खात्री करत त्यांची राहण्याची सोय केली. सकाळ झाल्यावर गाडी रस्त्यावर काढण्यासाठी जेसीबी, क्रेनची सोय उपलब्ध नसल्याने शेवटी सर्व कुडली ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. मग काय सर्व ग्रामस्थ एकत्र येत एकीचे बळ दाखवत गावात असणारे दोर, लोखंडी तारा आणि मनुष्यबळ वापरुन गाडी ढकलत रस्त्यावर‌ काढली.


दरम्यान, या अपघातानंतर भोर महाड मार्गावर वाहन चालकांना सहज दिसेल असे दिशादर्शक फलक लावणे गरजेचे झाले आहे. या मार्गावर आंबेघर आणि निगुडघर येथे नेहमी वाहनांची दिशाभूल होऊन रस्ता चुकण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे वाहनचालकांना दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.