चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : यंदाच्या वर्ल्डकपचे (World cup 2023) यजमानपद भारताकडे असून स्पर्धेतील अर्ध्याहून सामने कोणत्याही अडचणींशिवाय पार पडले आहेत. मात्र पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यातील गहुंजे येथे असलेल्या या स्टेडियममध्ये (gahunje stadium) सामने होत असल्याने स्थानिक नागरिक नाराज आहेत. स्टेडियममध्ये सामने होत असल्याने स्थानिकांना त्रास होत नाहीये. स्थानिकांच्या नाराजीचे कारण दुसरं आहे. दुसरीकडे येथील शेतकरी मात्र सुखावला आहे. पुणे-मुंबईहून मोठ्या संख्येने येणाऱ्या चाहत्यांसाठी गावातील शेतकरी पार्किंगसाठी जागा भाड्याने देऊन पैसे कमवत आहेत. मात्र या क्रिकेट मॅचमुळे गहुंजे ग्रामस्थ प्रचंड त्रस्त असल्याचे चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मावळ मधील गहूंजे क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्डकपच्या मॅच होत आहेत. या दरम्यान विविध भागातून क्रिकेटप्रेमी स्टेडियमवर येत असतात. स्टेडिमच्या आजूबाजूला वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. मात्र गहूंजेमध्ये क्रिकेटचे सामने होत असताना गावांतील लोकांनाच रस्त्यावरून ये - जा करण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जात असल्याचे समोर आलं आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने गहुंजे गावातील स्टेडियमवर होत असल्याने ग्रामस्थ स्वागत करत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांच्या कारवाईमुळे जीवनावश्यक गोष्टीही मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.


सामन्यादरम्यान, पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांची अडवणूक होत असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला तसेच दूध विक्रीसाठी बाजारपेठत जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाण्यासाठी रस्त्यावरून ये जा करून दिली जात नाही. आधार कार्ड, ओळखपत्र दाखवून देखील पोलीस प्रशासनाकडून मज्जाव केला जातो. त्यामुळे गहुंजे ग्रामस्थ गावांत होणाऱ्या सामन्यामुळे त्रस्त झाले आहेत. वर्ल्ड कपच्या मॅच झाल्यानंतर गहूंजे स्टेडियम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थाकडून देण्यात आला आहे. 


यापूर्वीचे तत्कालीन अध्यक्ष अजय शिर्के यांनी ग्रामस्थांना पासेस दिले होते. त्यावेळी गावकऱ्यांना कोणतीच अडचण निर्माण होत नव्हती. मात्र आताचे अध्यक्ष रोहित पवार यांनी गहूंजे ग्रामस्थांचा कोणताच विचार केला नाही आणि क्रिकेट सामने सुरु केले असे गावकऱ्यांचे म्हणणं आहे. गहूंजे सरपंच कुलदीप बोडके यांच शिष्टमंडळाने एमसीए क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांची भेट घेऊन या अडचणी बाबत चर्चा केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.


"स्टेडिअमध्ये सामने होत असताना ग्रामस्थांना प्रचंड अचणींचा सामना करावा लागत आहे. गहूंजे गावात मोठ्या प्रमाणात शेती आणि दुग्धव्यवसाय चालतो. मात्र एमसीए क्रिकेट असोसिशनमुळे शेतकऱ्यांना सकाळी माल बाहेर घेऊन जाता येत नाहीये. गावातून शेतकरी शेतमाल घेऊन जात असताना पोलिसांकडून त्यांची अडवणूक केली जात आहे. जे शेतकरी मार्केटमध्ये पोहोचलेले असतात त्यांना गावात येऊ दिलं जात नाही. इतर सामन्यांमुळे आम्ही सहकार्याची भावना ठेवली आहे. परंतु हे सामने झाल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला आम्ही इशारा देतो की वाहतुकीच्या समस्या सोडवल्यानंतर नाहीत तर या स्टेडिअमवर एकही सामना होऊ देणार नाही," असा इशारा गहुंजे ग्रामस्थांनी दिला आहे.