अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?
Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली.
Ola Uber News: प्रवास करत असताना रेल्वे, बस, खासगी वाहन, टॅक्सी आणि App च्या माध्यमातून पुरवली जाणारी कॅब सुविधा या साधनांची मोठी मदत होते. वेळेनुसार प्रत्येकजम प्रवास करण्याचं माध्यम निवडून त्या माध्यमानं अपेक्षित ठिकाणी पोहोचतो. यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये Ola Uber ची लोकप्रियता आणि त्याहून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेकांना Luxury वाटणारी ही App Based कॅब सुविधा हल्ली बरेचजण सर्रास वापरतात. त्यातही या सुविधेमध्ये आता ऑटो, शेअर कॅब आणि शेअर ऑटो असेही पर्याय उपलब्ध असल्यामुळंसुद्धा अनेकांचीच Ola Uber ला पसंती असते. पण, आता मात्र याच कॅबची उपलब्धता नसल्यामुळं बऱ्याचजणांची तारांबळ उडणार आहे.
तुम्हीही ओला- उबरनं प्रवास करणार असाल तर, 20 फेब्रुवारीनंतर तुमची गैरसोय होणार आहे. डोक्यावर हात मारण्याची वेळ आली, असंच वाटतंय ना? सध्या पुण्यातील Ola Uber नं प्रवास करणाऱ्यांसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरणार आहे. कारण, 20 फेब्रुवारीनंतर शहरातील ओला आणि उबर सेवा बंद असणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले दर लागू करण्याच्या हेतूनं पुणे, चिंचवडमधील कॅब चालकांकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे. हे नवे दर लागू न झाल्यास कॅब सुविधा बंद असेल असं सांगण्यात येत आहे.
हेसुद्धा वाचा : कंपनीकडून पीएफ खात्यात पैसे जमा केले जातायत की नाही? असं Check करा
सदर बंदअंतर्गत कॅब चालकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरटीओ ऑफिससमोर निदर्शनंही करण्यात येणार आहेत. कॅब चालकांनी केलेल्या आरोपांनुसार सध्या कंपन्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले दर लागू करण्यास टाळाटाळ दर्शवली आहे, ज्यामुळं कॅब चालकांनी बंदचं पाऊल उचललं असून, प्रवाशांची यामुळं मोठी गैरसोय होणार आहे.
नव्या दरांचं प्रकरण काय?
जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन कंपनीच्या अध्यक्षांनी कॅब कंपन्यांसाठी दर पत्रक जारी केलं, 1 जानेवारी 2024 पासून हे दरपत्रक लागू झालं होतं. पण, ओला आणि उबर या कंपन्यांनी मात्र अद्याप हे नवं दरपत्रक लागू केलेलं नाही. ज्यामुळं कॅब चालकांचं कमिशनही वाढत नसून त्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. त्यामुळं ही समस्या मिटवण्यासाठी आणि नवं दरपत्रक लागू करण्यासाठी म्हणून ही बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे शहरातील जवळपास 20 हजार कॅब चालक या आंदोलनात सहभागी होणार असल्याची प्रथमिक माहिती मिळत आहे.