पुण्यातील जवान लडाखमध्ये शहीद! `तो` Video Call ठरला अखेरचा; मुलाने विचारलेलं, `पप्पा तुम्ही कधी...`
Pune News : पुणे येथील भारतीय लष्कराच्या रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे जवान हवालदार दिलीप बाळासाहेब ओझरकर हे रविवारी लडाख प्रदेशात एका रस्ते अपघातात शहीद झाले आहेत. आज त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) एका भारतीय लष्कराच्या (Indian Army) जवानाचे अपघाती निधन झाले आहे. कारगिल ते लेह मोहिमेवर जाताना प्रवासादरम्यान पुण्यातील सैन्यदलातील जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर (वय 38) हे शहीद झाले आहे. दिलीप बाळासाहेब ओझरकर हे पुण्यातील भवानी पेठेतील भवानी माता मंदिर परिसरात वास्तव्यास होते. ओझरकर यांच्या निधनाने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. ओझरकर हे हवालदार या पदावर अभिमानाने देश सेवेचे काम करत होते.
15 एप्रिल 2004 रोजी दिलीप ओझरकर हे भारतीय सैन्यात भरती झाले होते. मात्र दीड ते दोन वर्षापूर्वीच ते सेवेतून निवृत्त ही झाले होते. पुन्हा त्यांनी कालावधी वाढवून देशसेवा करण्यास पसंती दिली. सराव मोहिमेसाठी जाताना 3 सप्टेंबर रोजी रविवारी दुपारी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. सराव मोहिमेसाठी जात असताना 3 सप्टेंबर रोजी रविवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला. दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास ते शहीद झाल्याचे माहिती ओझरकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
दिलीप ओझरकर यांचे पार्थिव विमानाने लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे आई, वडील,पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
सोमवारी सकाळीच दिलीप यांचे त्यांच्या मुलांशी फोनवर बोलणं झाले होते. पप्पा तुम्ही कधी येणार आहात अशी विचारणा मुलांना दिलीप यांच्याकडे केली होती. दिलीप यांनी वडील बाळासाहेब ओझरकर यांनासुद्धा व्हिडीओ कॉलद्वारे भारत पाकिस्तान सीमेवर असल्याचे सांगितले होते. तिथे खूप थंडी असल्याचेही दिलीप यांनी यांनी वडिलांना सांगितले होते. बाळासाहेब ओझरकर हे मावळ येथे ओझरडी गावात शेती करतात. मोठ्या कष्टाने त्यांनी मुलाला सैन्यात भरती केले होते. दिलीप ओझरकर यांच्या आकस्मित जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.