हेमंत चोपडे, झी मीडिया, पुणे : भरधाव कार (Car Accident) थेट विहिरीत कोसळून कार चालकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या (Pune News) शिरुरमध्ये समोर आला आहे. भरधाव असलेली कार थेट विहीरीत (Well) कोसळल्याने चालकाला बाहेर पडता आले नाही आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. शेवटी जेसीबीच्या (JCB) सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. यानंतर कार चालकाचा मृतदेह गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे हा सर्व प्रकार घडला आहे. चालकाचे वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटलं आणि ती थेट विहीरीत कोसळली. काहीच वेळ सफेद रंगाची कार पाण्यात गायब झाली. दुर्दैवाने कारचालकाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. कार थेट विहिरीत कोसळल्याचे पाहून स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. 


राहुल पठाडे असं मृत कार चालकाचे नाव असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने जेसीबी बोलवून कार विहिरीबाहेर काढली. मात्र कार चालक राहुल पठाडे याचा या अपघातात मृत्यू झाला.


किरकोळ वादातून थेट अंगावर घातली कार 


संभाजीनगरमध्ये किरकोळ वादातून एका वकिलाने लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. बजाज हॉस्पिटलसमोरील महूनगरजवळ कार चालकाने चार जणांच्या अंगावर गाडी घातली. पेशाने वकील असलेल्या राजपूत नावाच्या व्यक्तीने कारसमोर उभ्या असलेल्या लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जुन्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. लोकांना चिरडल्यानंतरही कार चालक वाद घालत असल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले आहे.