सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : दिव्यांग लोकांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पाहिजे तितका बदलला नाहीये. काही अपवाद सोडले तर आजही अनेकजण दिव्यांग लोकांना सामान्यांप्रमाणे वागणूक कधीच देत नाही. सहानुभूतीपूर्ण कटाक्ष त्यांच्याकडे टाकून पुढे चालायला लागतो. मात्र आपल्या याच समाजात काही पठडीबाहेरील विचारसरणीचे लोक देखील आहे, जे स्वतःसाठी जगताना इतरांचा देखील विचार करतात. यातल्याच एक आहेत डॉ. सोनम कापसे. डॉ कापसे यांनी पुण्यामध्ये मूकबधिरांसाठी हॉटेल सुरु केले आहे. पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अशा फर्ग्युसन कॉलेज रोडवर डॉ. कापसे यांनी ‘टेरासीन’ नावाचे हे हॉटेल सुरु केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे इथे काम करणारा जवळपास सर्वच स्टाफ दिव्यांग आहे. वेगळ्या कल्पकतेने कापसे यांनी या हॉटेलची निर्मिती केली आहे. हे हॉटेल सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. या हॉटेलमध्ये आल्यावर काही दिव्यांग मुलं अतिशय प्रेमाने आणि आपलेपणाने हसून तुमचे स्वागत करतात. टेरासीन हॉटेलमध्ये स्टाफला आणि ग्राहकांना देखील लक्षात येईल अशा सोप्या आणि सुटसुटीत मार्गांचा वापर केला आहे. इथल्या मेन्यूमध्ये प्रत्येक पदार्थासमोर काही विशिष्ट सांकेतिक भाषेची चित्रे आणि खुणा दिल्या आहेत. त्यापाहून ग्राहक कर्मचाऱ्यांना ऑर्डर देतात.


कर्मचारी देखील त्यांच्या भाषेत ही ऑर्डर लिहून घेतात आणि त्यांना पाहिजे तो मेनू त्यांच्यासमोर सादर करतात. हा मेनू पाहून कोणीही अगदी सहज आपली ऑर्डर देऊ शकेल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. काहीही ऐकू तसेच बोलता येत नसताना सुद्धा इथे काम करणारे सर्व कर्मचारी ग्राहकांना उत्तम सेवा देतात.


हे हॉटेल ज्यांच्या संकल्पनेतून तयार झाले आहे, त्या डॉ. सोनम कापसे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आणि या मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी हे पाऊल उचल्याचे म्हटले आहे. डॉ. सोनम कापसे स्वतः वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. अशा मूकबधिर मुलांचे दुःख खूप जवळून अनुभवल्याने त्यांच्या समस्या डॉ. सोनम यांच्या लक्षात आल्या होत्या. या मुलांसाठी काहीतरी करण्याचे त्यांनी ठरवले होते. याच विचारातून त्यांनी हे हॉटेल सुरु केले आहे.


डॉक्टर सोनम कापसे सांगतात की, त्यांची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विविध पातळीवरती दिव्यांग आणि दुर्लक्षित घटकांना दुर्लक्ष घटकांच्यासाठी काम करण्याचे विविध रिसर्च पेपर्स सादर झालेले आहे. याबाबत त्याचा विशेष अभ्यास असून डॉ. सोनम कापसे यांनी टाटा इस्टिट्यूटमध्ये देखील काम केले आहे. कापसे यांनी तीन वर्षे दिव्यांगांच्या समस्यांवरती अभ्यास केला. 


या हॉटेलच्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना देखील दिव्यांग व्यक्तींबद्दलची जवळीक वाढण्यास मदत होत आहे. समाजात त्यांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार असून तो सन्मान मिळवण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून देणे ही गरज आहे. ही गरज ओळखून डॉ. सोनम कापसे यांनी या हॉटेलद्वारे त्यांना सन्मानाने जगण्याची उर्मी बहाल केली आहे.