हेमंत चोपडे, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या (Pune News) शिरुर (shirur) भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पाण्यात बुडून दोन वर्षांच्या चिमुकल्यासह त्याच्या वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्विमिंग टॅंकमध्ये बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात बापालाही जीव गमवावा लागला आहे. बापलेकाच्या मृत्यूमुळे शिरुर तालुक्यात शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चिमुकल्याच्या आईनेही पाण्यात उडी घेतली होती. मात्र तिला वाचवण्यात यश आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबुत येथे दुर्दैवी घटना घडली असून कृषी पर्यटन केंद्रात बनवण्यात आलेल्या स्विमिंग टॅंक मध्ये बुडून बाप लेकाचा दुर्दैवी रित्या मृत्यू झालाय. राजवंश गाजरे असं दोन वर्षीय मृत चिमुकल्या मुलाचे नाव असून सत्यवान शिवाजी गाजरे (28) असं मृत वडिलांचे नाव आहे. तर मुलाची आई स्नेहल गाजरे हिला वाचवण्यात लोकांना यश आले आहे. या धक्कादायक घटनेनंतर गाजरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


बेल्हे-जेजुरी महामार्गावर जांबूत येथे शिवाजी गाजरे यांच्या मालकीचे  चारंगबाबा हॉटेल आणि कृषी पर्यटन केंद्र आहे. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिवाजी गाजरे हे त्यांच्या मुलगा सत्यवान आणि पत्नी आणि नातू राजवंश यांना पर्यटन केंद्रावर घेऊन आले होते. त्यावेळी खेळता खेळता नातू राजवंश हा पाय घसरुन स्विमिंग टॅंकमध्ये पडला. राजवंशला वाचवण्यासाठी सत्यवान यांनी पोहता येत नसतानाही स्विमिंग टॅंकमध्ये उडी घेतली.  मात्र मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नानत सत्यवान देखील पाण्यात बुडू लागले.


पतीला बुडताना पाहून सत्यवान यांची पत्नी स्नेहल गाजरे यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र त्यांनाही पोहता येत नसल्याने त्या बुडू लागल्या. त्यावेळी आराडाओरडा ऐकून सत्यवान यांचा भाऊ किरण आणि तिथल्या एका कर्मचाऱ्याने स्विमिंग टॅंककड धाव घेतली. दोघांनीही पाण्यात उडी घेऊन सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्नेहल यांनाच वाचवण्यात यश आले. त्यानंतर सत्यवान आणि राजवंशला वर काढण्यात आल्यानंतर दोघांनाही आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच दोघांनाही मृत घोषित केले. रात्री उशिरा दोघांवरही जांबुत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जांबूतसह शिरुर तालुक्यात शोककळा पसरली आहे. तर मुलगा आणि नातवाचा मृत्यू झाल्याने गाजरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वतःच्याच मालकीच्या हॉटेल परिसरात हा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.