Pune Crime : महिन्याभरावर लग्न, इमारतीखाली होणाऱ्या पत्नीचा मृतदेह... भावी पतीने उचललं टोकाचं पाऊल
Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. पिंपरीत राहणाऱ्या युवतीचा मृतदेह येरवड्याच्या कल्याणी नगर भागात असलेल्या इमारतीखाली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे
Pune Crime : पुण्याच्या येरवाडा भागात होणाऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर भावी पतीनेही आपलं आयुष्य संपवलं आहे. येरवाडा (Yerwada) येथील कल्याणी नगर भागात राहणाऱ्या युवतीचा इमारतीच्या खाली मृतदेह आढळून आला होता. हा विरह सहन न झाल्याने युवतीसोबत लग्न ठरलेल्या तरुणानेही आत्महत्या केली आहे. पिंपरीतील (Pimpri) खराळवाडी भागात राहणाऱ्या या तरुणाने दुखः सहन झाल्याने घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. दुसरीकडे पोलिसांनी युवतीच्या आत्महत्येचा जबाबदार असल्या प्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याणी नगर येथे इमारतीखाली सतरा वर्षीय मुलीचा मृत्यू आढळून आला होता. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने तिचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली होती. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या याचा उलघडा झालेला नसतानाच या मुलीचे ज्याच्याशी लग्न ठरले होते त्या मुलाने देखील आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही तरुणीसुद्धा पिंपरीतील खराळवाडी भागातच राहत होती. मात्र 14 मार्च रोजी कल्याणी नगर येथील एका इमारतीच्या खाली युवतीचा मृत्यूदेह आढळून आला होता. येरवाडा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र त्यानंतर युवतीच्या नातेवाईकांनी तिने आत्महत्या केल्याचे म्हटले.
नातेवाईकांनी युवतीचा मृतदेह येरवडा पोलीस ठाण्यात आणल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी मुलीच्या आईने येरवाडा पोलिसांत फिर्याद दिली होती. युवतीचे पुन्हा शवविच्छेदन करुन या प्रकरणाचा खुनाच्या अनुषंगाने तपास करावा आणि दोषींना अटक करावी अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी लावून धरली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीनुसार युवतीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी जॉनी कुरियन, राजेश कांबळे, जनक शाही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
भावी पतीचीही आत्महत्या
पुढील महिन्यात मृत युवतीचे जयेश रामदास मंगळवेढेकर नावाच्या तरुणासोबत लग्न होणार होते. मात्र युवतीच्या मृत्यूची बातमी समजताच त्याने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या गळफास घेऊन जयेशने आत्महत्या केली. ही माहिती समजताच खराळवाडीत एकच खळबळ उडाली आहे.
त्या युवतीसोबत नेमकं काय घडलं?
दरम्यान, 14 मार्च रोजी मृत युवती ही कल्याणीनगर भागात मित्रांना भेटायला गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह इमारती खाली सापडला होता. आरोपी आणि मृत युवतीमध्ये पैशांचा व्यवहार झाला होता. आरोपींनी पैशांचा तगादा लावल्याने मुलीने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबियांनी फिर्यादीत म्हटले आहे. दुसरीकडे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास 'वेस्ट व्ह्यू' सोसायटीच्या आवारात ही युवती मोबाइलवर जोरजोराने वाद घालत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे नेमके काय झाले हे पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल.