माझ्या पत्नीला काहीच कळत नाही, घटस्फोट हवा: पतीची मागणी कोर्टाकडून मान्य
Pune Divorce News : पुण्यात घटस्फोटाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीचा बुद्ध्यांक कमी असल्याने वैतागलेल्या पतीने कोर्टात धाव घेत घटस्फोट मागितला होता. कोर्टाने पतीची बाजू ऐकत दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे.
Pune News : अनेक विवाहित जोडप्यांमध्ये एक मत नसेल, स्वभाव जुळत नसतील किंवा अन्य कोणतीही कारणे असतील तर विसंवाद सुरु होतो आणि तो घटस्फोटापर्यंत (Divorce) पोहोचतो. मात्र पुण्यात (Pune) एक वेगळंच प्रकरण समोर आले आहे. पुण्यात पत्नीचा बुद्ध्यांक (IQ) कमी असल्याने पतीने थेट कोर्टात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज केला. महत्त्वाची बाब म्हणजे पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने (Family Court) मान्य केला आहे. या घटस्फोटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
पत्नीचा बुद्ध्यांक कमी असल्याने तसेच ती सुज्ञ नसल्याने तिच्या वागण्याला कंटाळलेल्या पतीने कौटुंबिक न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने पातीची बाजू समजून घेत त्याची मागणी करत दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे. घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचे 6 जुलै 2021 रोजी लग्न झाले होते. मात्र पत्नीच्या वागण्याच्या त्रासाला कंटाळून पतीने दोनच वर्षात घटस्फोटासाठी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयत अर्ज केला होता. न्यायलयाने पती बाजू ऐकून घेत दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.
दोघांचेही लग्न झाल्यानंतर पत्नीचे घरात कोणत्याही कामात लक्ष लागत नसल्याचे पीडित पतीच्या लक्षात आले होते. छोट्या छोट्या गोष्टीत पत्नी दुर्लक्ष करत होती. पतीने पत्नीची समजूत काढण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, तिच्यात कोणतीही सुधारणा होत नव्हती आणि ती वारंवार चुका करत होता. एकदा तर पती घरी नसतांना पत्नीने घरातील गॅस तसाच सुरू ठेवला होता. शेजारच्यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी घरी येऊन गॅस बंद केला. नाहीतर मोठा अनर्थ घडला होता. ही गोष्ट शेजाऱ्यांनी पतीला सांगितली. त्यावेळीही पतीने पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, ती समजून घेत नव्हती.
पत्नीच्या अशा वागण्याने पतीला तिच्यावर शंका आली. पतीने तिचा बुद्ध्यांक तपासण्याचे ठरवले आणि तिची बुद्ध्यांक चाचणी करून घेतली. चाचणीमध्ये पत्नीचा बुद्ध्यांक हा कमी असून तिला अनेक बाबी समजत नसल्याची धक्कादायक माहिती पतीला कळाली. पतीला ही माहिती कळताच त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. पत्नीवर उपचारांची गरज असल्याचे पतीने तिच्या आई वडिलांना सांगितले. मात्र मुलीच्या आई वडिलांनी याकडे दुर्लक्ष करत तिच्या उपचारासाठी नकार दिला.
दरम्यान, या सर्व गोष्टींना वैतागून पतीने पत्नीपासून घटस्फोट घेण्याचे ठरवले. पत्नीपासून घटस्फोट मिळण्यासाठी पतीने ॲड. रितेश भूस्कडे यांच्यामार्फत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे राघव यांनी दाखल केलेल्या दाव्यात नमूद केले. या दाव्याच्या सुनावणीला पत्नी हजर राहिली नाही. त्यामुळे न्यायालयाने एकतर्फी आदेश दिला. ‘पत्नीने पतीला क्रुरतेची वागणूक दिली. त्यामुळे ते घटस्फोट मिळण्यास पात्र आहे,’ असे न्यायालयाने म्हटले आहे.