सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) सुपरहिट थ्री इडियट (3 Idiot) हा चित्रपट तुम्हाला आठवतोय. आमिर खान म्हणजे रेंचोच्या शिक्षणाची डीग्री वापरत रणछोडदास छांछड (Ranchodas Chanchhad) इंजिनिअर बनतो आणि त्या डीग्रीचा वापर करत मोठमोठे कंत्राट घेतो. आता ही झाली चित्रपटाची स्टोरी. पण पुण्यात (Pune) प्रत्यक्षात अशी घटना समोर आली आहे. बहिणीची बनावट कागदपत्रं वापरून शिक्षण अधिकारी झालेल्या बनावट शिक्षकाला लोणीकंद पोलीसांनी अटक केली आहे. राज्यात शिक्षण मंडळाच्यावतीने बोगस शिक्षकांवर (Bogus Teacher) कारवाईची मोहीम सुरू असताना पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशन (Lonikand Police Station) इथं या बोगस शिक्षकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनावट शिक्षिकेला अटक
या प्रकरणी पोलिसांनी संगीता दत्तात्रय झुरुंगे हिला अटक केली आहे.  जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. 12 सप्टेंबरला प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिला आहे. संगीता झुरुंग यांनी बहिणीची कागदपत्र वापरुन तसंच बनावट कागदपत्रं (Forged Documents) तयार करुन त्या आधारे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवत शासनाची आर्थिक फसवूणक केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. 


शासनाची आर्थिक फसवणूक
संगिता झुरुंग हिने मगरवस्ती वस्तीशाळेवर 12 जून 2006 ते फेब्रुवारी 2014 अखेर निमशिक्षक म्हणून काम केलं. धक्कादायक म्हणजे संगीता झुरुंग हिचं फक्त अकरावीपर्यंत शिक्षण झालं आहे. संगीता झुरुंगने बहिण रुपाली टिळेकर हीची बारावीची कागदपत्र वापरली. तसंच खोट्या कागदपत्रांचा वापर करत नाव गॅझेट करुन घेतलं आणि त्या आधारे नोकरी मिळवली. गेली तब्बल 16 वर्ष त्या नोकरी करत असून आतापर्यंत त्यांनी 40,62846 इतका पगार घेतला आहे. 


विभागाची धडक कारवाई
बनावट कागदपत्र वापरून काही जणं शिक्षक म्हणून कामावर रुजू झाले आहेत. आत्ता बोगस शिक्षकांच्या बाबतीत शिक्षण आयुक्तांनी मोहीम सुरू केली असून याबाबत वेळोवेळी शिक्षकांची कागदपत्राची तपासणी केली असल्याचं शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितलं. बनावट शिक्षक आढळल्यास कडक कारवाई करण्यात येत असल्याचंही मांढेर म्हणाले.


बोगस शाळांना टाळं
दरम्यान, राज्यात तब्बल 100 बोगस शाळांना टाळं ठोकण्यात आलं आहे. राज्यात CBSE, ICSE आणि IB या मंडळाच्या जवळपास 800 शाळा बोगस असल्याचं निष्पन्न झालं होतं. या सर्व शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यातील शंभर शाळांना कायमस्वरुपी टाळे ठोकल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. कागदपत्रांच्या बाबतीत गंभीर चुका करणाऱ्या शाळांवर देखील फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.