धक्कादायक! पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा निर्घृण खून
त्याला मुलीचा फोन आला म्हणून तो भेटायला गेला, पण परत घरी आलाच नाही
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे .उरुळी कांचन (ता. हवेली) इथल्या मूळ निवासी असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय मुलाचा चार ते पाच जणांनी खून केला. हडपसर ग्लायडिंग सेंटर येथे मंगळवारी संध्याकाळी साडेदहा ते पाऊणे आकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.
गिरीधर उत्रेश्वर गायकवाड (वय २१, रा. गोपाळपट्टी, पार्क साई टॉवर मांजरी ता. हवेली, मूळ गाव उरळी कांचन) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. हा खून एका तरुणीसह पाच जणांनी केल्याचं उघडकीस आले आहे.
मृत गिरीधर याचे वडील उत्रेश्वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेलर म्हणुन काम पाहतात. याप्रकरणी मृताचा भाऊ निखिलकुमार उत्रेश्वर गायकवाड यांने हडपसर पोलिसात तक्रार दिली आहे.
गिरीधर हा मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरी बसला होता. त्यावेळी एका मुलीचा फोन आला होता. फोननंतर तो घराबाहेर पडत असताना भाऊ निखीलकुमार याने कुठे चालला विचारले. यावर गिरीधर याने आपली मैत्रीण साक्षी पांचाळ हिचा फोन आला होता, मी तिला अर्ध्या तासात भेटून येतो असं सांगून गिरीधर घराबाहेर पडला.
त्यानंतर अर्धा तास होऊनहि गिरीधर घरी परत न आल्याने, त्याची आई आणि भाऊ काळजीत असतानाच गिरीधर याचे वडील उत्रेश्वर गायकवाड यांनी फोनवरून गिरीधर याचा खून झाल्याची माहिती निखील आणि त्याच्या आईला दिली.