Video: पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्याला बाईकस्वाराने उडवलं; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू
Pune Accident News : पुण्यातून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्यानंतर दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात रस्ता ओलांडणारी व्यक्ती देखील गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : भरधाव वाहनांमुळे अनेक अपघाच्या घटना रोज समोर येत असतात. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो तर काहींना अपंगत्व देखील येतं. अशातच पुण्यातून अपघाताची अशीच एक भीषण घटना समोर आली आहे. पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक अपघाताची घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुरुवारी रात्री हा अपघात झाला. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला दुचाकीचालकाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत उरुळी कांचन येथील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
साहेबआण्णा विठ्ठल आलूरे (वय- 35, रा. मदारानी पराग, ता. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक), असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर जालिंदर शेंडगे (वय- 45, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साहेबअण्णा आलोरे हे सोलापूरच्या दिशेने दुचाकीवर निघाले होते. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील इरिगेशन कॉलनी या ठिकाणी आले असता त्याचवेळी जालिंदर शेंडगे हे महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी आलोरे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्ता ओलांडत असलेले शेंडगे यांना जबर धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी कस्तुरी रुग्णवाहिका लाईफ केअर या रुग्णवाहिकेशी संपर्क साधून दोघांना उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, उपचारादरम्यान दुचाकीचालक आलोरे यांचा मृत्यू झाला असून शेंडगे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.