Tamhini Ghat Plus Valley Video : भुशी धरणाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध घेतला जात आहे. अशातच आता मुळशीच्या ताम्हिणी घाटातील एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आलाय. ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीमध्ये एक तरुण वाहून गेल्याचा प्रकार समोर आल्याने आता प्रशासन देखील खडबडून जागं झाल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लस व्हॅलीमध्ये एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्वप्नील धावडे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे. जीव धोक्यात घालून हा तरुणानं पाण्यात उडी मारली आणि वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. या व्हिडीओमध्ये धबधब्यात उडी मारताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याचा सहकारी मागे मोबाईलमध्ये रील शूट करताना दिसतोय. या घटनेनंतर आता काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.


पाहा Video



धबधब्यातील पाण्यात उडी मारल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहासोबत वाहत गेला. पाण्याच्या वेग जास्त असल्याने त्याला खळग्याच्या कडेला जाता आलं नाही. तरुणाचा मृतदेह मानगावमध्ये सापडल्याची माहिती देखील समोर येतीये. या घटनेमुळे आता संपूर्ण परिसरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.


मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार आता सर्व जिल्हाधिकारी जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढवा घेणार आहेत. पावसाळी पर्यटन सुरक्षित होणे गरजेचे आहे, त्यामुळे सर्व धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जीवन रक्षक तैनात करा, कार्डिक रुग्णवाहिका ठेवा, एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी ठेवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.


दरम्यान, एकीकडे भुशी डॅमवरची दुर्घटना ताजी असतानाच दुसरीकडे कोल्हापुरात पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. जवळपास 6 बंधारे पाण्याखाली गेलेत. पाण्याखाली गेलेल्या या बंधाऱ्यावरची वाहतूक प्रशासनाने थांबवायला हवी होती. मात्र अजूनही या बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरूय.