तुमचं पाल्य बोगस शाळेत तर जात नाही ना? शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारी बातमी...
विद्येचं माहेरघर पुण्यात बोगस शाळांचा सुळसुळाट, CBSE च्या 3 शाळा बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघड
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : विद्येचं माहेरघर पुण्यात (Pune) बोगस शाळा ( Bogus School) सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एक दोन नव्हे तर तब्बल तीन CBSE (Central Board of Secondary Education) शाळा बोगस असल्याचं समोर आलंय. या शाळांकडे शासनाचं बोगस प्रमाणपत्र (Bogus Certificate) आढळून आलंय. शिक्षणविभागानं (Education Department) या बोगस शाळांची नावं जाहीर केली असून कारवाईचा बडगा उगारलाय.
या आहेत तीन बोगस CBSE शाळा
पुणे जिल्ह्यातील एम.पी.इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (M.P. International School and Junior College), नमो RIMS इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (Namo RIMS International School & Junior College) आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीचं पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (Creative Education Society's Public School and Junior College) अशी या बोगस शाळांची नावं आहे. शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी या बोगस शाळांची यादी जाहीर केलीय.
बारा लाखात बोगस प्रमाणपत्र
या तिन्ही CBSE या इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे शासनाचे प्रमाणपत्र आहे, ते प्रमाणपत्र बनावट असल्याचं आढळून आले आहे. धक्कादायक म्हणजे बारा लाख रुपयात बनावट एनओसी (NOC) देणारी टोळी कार्यरत असल्याचं समोर आलं आहे.
या शाळांची माहिती आम्ही शासनाला दिली असून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. तसंच आम्ही जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांना सूचना दिल्या असल्याचं शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी सांगितलं. तसंच प्रत्येक सीबीएससी शाळांनी आपली मान्यता प्रमाणपत्र शासनाच्या बोर्डाच्या खाली लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे.