निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : भोर तालुक्यातील किल्ले रायरेश्वर (Raireshwar) पठारावर जाण्यासाठी साधी पायवाटही नसल्याने, दगडी पायऱ्या आणि लोखंडी शिडीचा उपयोग केला जातो. ही शिडी तीव्र उताराची असल्याने शिडीवरुन गडावर‌ जाताना आणि येताना भिती वाटत असते. शिडीवरुन पर्यटक, नागरिकांना मोकळे जातानाही, दमछाक होत असते. अशा परिस्थितीत रायरेश्वर येथील शेतकरी बंधूनी शेती (Farming) कामासाठी ट्रॅक्टर (Tractor) खरेदी करत तो चक्क 4 हजार 694 उंच किल्ल्यावर नेहण्याची किमया केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला परिसरात पसरलेल्या 16 किलोमीटरच्या विस्तीर्ण पठावर,राहणाऱ्या कुटुंबांना शेतीसाठी, सोय व्हावी म्हणून किल्ल्यावरील दोघा शेतकरी भावांनी ट्रॅक्टर खरेदी करत थेट 4 हजार 694 फूट उंचीवर नेलाय. या पठरावर राहणाऱ्या कुटुंबांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. इतके दिवस पारंपरिक पद्धतीने मशागत करत शेती केली जात होती. मात्र शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी, आणि शेतकऱ्यांना शेती करणे सोप्प जावं यासाठी या दोघा भावांनी हा निर्णय घेतला. इतिहासात पहिल्यांदाच 4 हजार 694 फूट उंची असणाऱ्या रायरेश्वर किल्ल्यावर अशा प्रकारे ट्रॅक्टर नेण्यात आलय. परिसरात सध्या याची चांगलीच चर्चा सुरु आहे.


रायरेश्वर येथील अशोक रामचंद्र जंगम आणि रविंद्र रामचंद्र जंगम या दोघा शेतकरी बंधूंनी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी केला. पण रायरेश्वरावर चालत जाणेही अवघड असताना ट्रॅक्टर न्यायचा कसा हा प्रश्न होता. मात्र जिद्द आणि इच्छा शक्तीने पेटून उठल्यावर अशक्य गोष्ट ही साध्य करता येते याचे उदाहरण या शेतकरी बंधूनी दाखवून दिले आहे.


बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी खरेदी केलेला ट्रॅक्टर रायरेश्वराच्या पायथ्याशी नेण्यात आला. पायथ्यापाशी असलेल्या लोखंडी अरुंद शिडीवरुन ट्रक्टर वर पोहचवणे शक्य नसल्याने त्यांनी पायथ्यापाशी ट्रॅक्टर उभा करुन सोबत आणलेल्या मेकॅनिककडून ट्रॅक्टरचे टायर, इंजिन, मडगार्ड, साठा असे पार्ट वेगळे करण्यात आले. अवजारे आणि ट्रॅक्टर‌पासूंन वेगळे केलेले पार्ट 20 ते 25 ग्रामस्थांच्या मदतीने शिडीवरुन लाकडाच्या मेंढी लावून,रशीने बांधून डोली करत वर नेण्यात आले. तसेच ट्रॅकरचा मेन‌ सांगाडा, मागचे टायर आणि इंजिन लाकडाच्या मेढी लावून डोली करत अगदी हळूवारपणे धोका न पत्करता कड्या कपऱ्यातून अतिशय कठीण परिस्थितीत शिडीवरुन पठाराच्या सपाटावर नेण्यात आला. यासाठी मात्र ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली.


ट्रॅक्टरचे पार्ट आणि अवजारे पठारावर चढवायला बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस लागले. गुरुवारी शिडीवरुन पठारावर गेल्यावर ट्रॅक्टरचे वेगळे केलेले पार्ट जोडण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टर चालू करुन गावठाणात नेण्यात आला. अशा प्रकारे स्वतःच्या आणि परिसरातल्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी रायरेश्वर किल्ल्यावर ट्रॅक्टर नेण्याचे स्वप्न या दोन भावांनी साकार केलं. आजवरच्या इतिहासात रायरेश्वरावर पहिल्यांदाच शेतीसाठी ट्रॅक्टर नेण्यात आला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या किल्ले रायरेश्वरील 16 किलोमीटर पसरलेल्या पठारावर 300 लोकसंख्या असून, 45 कुटुंबे राहतात. हे ठिकाण भोरपासून 26 कि. मी. अंतरावर असून परिवहन मंडळाची बस कोर्ले गावापर्यंत जाते. तेथून पुढे रायरेश्वराकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते.त्यानंतर किल्ल्यावरील पठरावर जाण्यासाठी पायथ्याजवळ असलेल्या लोखंडी शिडीचा वापर ग्रामस्थ आणि पर्यटक पूर्वी पासून करीत आहेत.


पठारावर सेंद्रिय गव्हाची शेती बरोबरच नाचणी, वरईची शेती केली जाते. या शेतीची मशागत पारंपारीक मानव आणि बैलांच्या सहाय्याने केली जाते. जग यांत्रिकीकरणात पुढे जात असताना रायरेश्वरावर मात्र, यंत्र नेणं शक्य नसल्याने पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. परंतू रायरेश्वरावरील अशोक आणि रविंद्र यांनी अखेर ट्रॅक्टरच्या रुपाने पहिले शेती उपयोगी चारचाकी वाहन गडावर नेमण्याचा पराक्रम केला आहे.