मुंबई :  अवयव दान ही काळाची गरज झाली आहे. पण अजूनही पाहिजे त्या प्रमाणात अवयदानाविषयी जनजागृती होताना दिसत नाही. १३ ऑगस्ट हा अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्यावर आरोग्यविभागाने अवयव दानाची देशभरातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुणे अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे. 

    शासन, सामाजिक संस्थामार्फत वेळोवेळी अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. पण काही रुढी, परंपरा, अंधश्रद्धा यातून बाहेर न पडल्याने लोक अजूनही अवयवदान करण्यास धजत नाहीत. अवयवदान नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात असते. त्याचाच परीणाम म्हणून लोक मरणोत्तर अवयव दानासाठी तयारी दर्शवत आहेत. अवयवदान मोहिमेत २०१४-१५ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले. राज्यात अवयवदानामध्ये पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे. देशभरातील आकडेवारीनुसार पुणे ५४व्या, तर मुंबई ५९व्या स्थानावर आहे. त्यानंतर इंदूर, सुरत आणि कोइमतूर यांनी स्थान मिळविले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. विविध स्पर्धा-परीक्षांमध्ये नेहमी मुंबई-पुण्याची तुलना केली जाते. पण यावेळेस मात्र अवयव दानाच्या बाबतीत मुंबईला मागे टाकत पुण्याने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. पुण्यात १९८८ मध्ये पहिले अवयवदान झाले. त्यानंतर २५ वर्षांनी नोव्हेंबर २०१३मध्ये अवयवदान झाले. शिवाय, हृदयप्रत्यारोपणासाठीही २०१७ साल उजाडावे लागले. औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर यांनीही या क्रमवारीत स्थान मिळविले. विविध शहरातील आलेली आकडेवारी पाहता अजूनही मोठ्या पातळीवर अवयव दानाविषयी जागृती होण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे.

कोणत्या विभागात कसे झाले अवयवदान ?


राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे विभागीय प्रत्यारोपण समित्या आहेत. पुणे विभागातर्फे ४२ किडनी, यकृत २८, हृदय ६ व प्रॅन्क्रियाजचे १ प्रत्यारोपण झाले.  lत्यानंतर क्रमांक लागत असलेल्या मुंबई समितीमार्फत किडनी ३४, यकृत २२, हृदय १६ आणि एका फुफ्फुसाचे प्रत्यारोपण झाले. औरंगाबाद समितीमार्फत किडनी ६, हृदय १ तर, नागपूर विभागीय प्रत्यारोपण समितीमार्फत मूत्रपिंडे १२ व यकृत ३ असे प्रत्यारोपण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.