Trekker Died During Maval Bhimashankar Trek: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या एका ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने ट्रेकदरम्यानच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या ट्रेकरला वाचवण्याचा प्रयत्न सहकाऱ्यांनी केला मात्र त्यांना यश आलं नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव रमेश पाटील असं आहे. पुण्यातील मावळ ते भीमाशंकर ट्रेकदरम्यान रमेश पाटील यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी म्हणजे 16 जुलै रोजी घडली.


साडेसात तासांनंतर चक्कर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पावणेसात वाजता मावळमधील मालेगाव बुद्रुक गावातून या ट्रेकची सुरुवात झाली. ट्रेकर्सने भीमाशंकरच्या दिशेने वाटचाल सुरु केली. साडेसात तासांच्या ट्रेकनंतर म्हणजेच दुपारी अडीच वाजता या ग्रुपमधील सर्वजण खेड तालुक्यामधील गुप्त भीमाशंकर येथे पोहोचले. मात्र इथे हा ग्रुप थांबला असता रमेश पाटील यांना अचानक चक्कर आली. रमेश हे चक्कर आल्याने जमिनीवर कोसळले. बेशुद्धावस्थेतील रमेश यांना शुद्धीवर आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. शक्य ते सर्व उपचार या ग्रुपमधल्या सदस्यांनी करुन पाहिले मात्र रमेश यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. 


तोंडाने श्वास देण्याचाही प्रयत्न


रमेश यांच्या शरीराची हलचाल मंदावली होती. श्वासही अगदी थांबला होता. काही जणांनी शेवटचा उपाय म्हणून रमेश यांना तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही रमेश यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर 108 क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिकेला बोलावण्यात आलं. मात्र सर्वजण तुलनेनं दुर्गम भागात असल्याने रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी वेळ लागत होता. म्हणून सर्वांनी रमेश यांना उचलून भीमाशंकर मंदिराजवळ आणलं. यासंदर्भातील माहिती स्थानिक पोलिसांना म्हणजेच घोडेगाव पोलिसांना देण्यात आली. 


हार्ट अटॅकने मृत्यू


पोलिसांच्या मदतीने रमेश यांना तातडीने तळेघरमधील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. रमेश यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना घोडेगाव ग्रामी रुग्णालयात हलवलं. या ठिकाणी डॉक्टरांनी रमेश यांच्या हृदयाचे ठोके बंद पडल्याचं सांगत त्यांना ब्रॉट डेड म्हणजेच मृतावस्थेत दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. रमेश यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्यांचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये पोलिस आता पुढील तपास करत आहे. रमेश यांना आरोग्यासंदर्भातील काही समस्या यापूर्वी होत्या का? आयोजकांकडे ट्रेक आयोजित करण्याचा परवाना होता का यासारख्या गोष्टींचा सध्या शोध घेतला जात आहे.


ट्रेकला जाताना काळजी घ्या


सामान्यपणे मान्सूनमध्ये अनेक ग्रुप्सच्या माध्यमातून ट्रेकचं आयोजन केलं जातं. मात्र मागील काही वर्षांमध्य हैशी ट्रेकर्सची संख्या वाढल्याने आयोजकांचाही सुळसुळाट झाला आहे. काही आठवड्यांपूर्वीच लोहगडावर झालेली ट्रेकर्सची गर्दीचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र अशाप्रकारे ट्रेक आयोजित करणाऱ्यांकडे पुरेशी तयारी नसते असं दिसून येतं. त्यामुळे ट्रेकला जाताना आयोजिकांची पूर्ण माहिती ट्रेकर्सने घेतली पाहिजे.