युट्यूबवरुन दिले शेअर मार्केटचे धडे, विश्वास मिळवला, राजस्थानात बसून पुणेकराला घातला लाखोंचा गंडा
Cyber Fraud In Pune: शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला राजस्थानहून अटक
पुणेः गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सायबर चोरटे निरनिराळ्या शक्कल लढवून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून करतात.पुणे सायबर पोलीसांनी (Pune Police) शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. (Cyber fraud In Pune)
युट्यूब चॅनेलवरुन शेअर मार्केटचे धडे
या प्रकरणी सायबर पोलीसांनी मिलन जिनेंद्र जैन याला केदलगंज वर्कशॉप, अल्वर राजस्थान येथून अटक केली आहे. आरोपीला कोर्टामध्ये हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २२मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली असून अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अनिल डफळ हे करत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण जग करोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीमध्ये असताना पैसे कमविण्यासाठी घरबसल्या शेअरमार्केटमध्ये पैसे लावून त्याद्वारे पैसे कमवण्याकडे सर्वसामान्य जनतेचा जास्त कल झाला होता. याच गोष्टीचा फायदा घेवून राजस्थानमधील सायबर गुन्ह्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या अलवर जिल्ह्यामधील आरोपी मिलन जिनेंद्र जैन याने सन २०२० मध्ये शेअर मार्केटबाबत युटयूब चॅनल चालू करुन त्याद्वारे सुरवातील सर्वसामान्य लोकांना शेअरमार्केटचे धडे देवून व शेअर मार्केटमध्ये पैसा कसा कमवायचा याबाबत सांगून त्याचे सबस्क्रायबर वाढविले.
आरोपी मिलन जैन याचे तब्बल ४० हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर त्याने लोकांना शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग विंथ ए प्रो या कंपनीच्या माध्यमातून त्याच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितली. गुंतवणुक केल्यास मोठया प्रमाणात नफा मिळवून देतो असे आमिष त्याने दाखवले. त्याच्या जाळ्यात फसलेल्या पुणेकर गुंतवणुकदारांची सुमारे २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. सिंहगड रोड येथे राहणारे रणवीर राजेंद्र जाधव यांची फसवणुक झाल्याबाबत सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता.
जगातील सर्वात उंच शिव मंदिराला धोका?, १२,८०० फुट उंचीवर वसलेले तुंगनाथ मंदिर ६ अंशाने झुकले
पुणेकर तरुणाची फसवणूक
फिर्यादी यांनी आरोपीचे युटयूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरून संपर्क केला. तसंच काही रक्कम गुंतवल्यानंतर चांगला परतावा देवून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीकडे वेळोवेळी तब्बल २५ लाख रुपये ट्रेडिंग विथ ए प्रो या कंपनीच्या अॅक्सिस बँकेच्या खात्यावर पाठवून गुंतवणूक केली. त्यानंतर काही दिवसांनी शेअर मार्केटमध्ये तोटा झाला आहे असे सांगून आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली. आरोपीने फिर्यादी यांच्याबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील लोकांची देखील लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपी मिलन जैन यांच्याविरुध्द रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे देखील फसवणूकीचा व एमपीआयडी कायदा अन्वये गुन्हा नोंद असून, रबाळे पोलीसांनी आरोपीला राजस्थान येथून अटक केली होती. आरोपीचा ताबा हा पुणे सायबर पोलीसांना हवा असल्याने आरोपीचे अटक वॉरंट घेवून बेलापूर कोर्टाकडून आरोपीचा ताबा घेवून त्यास तळोजा जेल येथून ताब्यात घेत अटक करण्यात आलेली आहे.