Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत. असं असतानाच आता अपघातग्रस्त पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कारमध्ये बिघाड असल्याचं ठाऊक असतानाही बिल्डर विशाल अग्रवालने ही कार आपल्या अल्पवयीन मुलाला चालवण्यासाठी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भातील खुलासा अपघात झाला तेव्हा या अल्पवयीन मुलाच्या बाजूला कारमध्ये बसलेल्या चालकाने दिली आहे.


चालकाने नोंदवला जबाब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल अग्रवालच्या चालकाने कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आपला जबाब नोंदवला आहे. याच जबाबाचा दाखल पोलिसांनी बुधवारी कोर्टात दिला. विशाल अग्रवालने त्याच्या चालकाला, 'मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला चालवू दे! तू बाजूला बस,' अशी सूचना केल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली. विशाल अग्रवाल दोन तरुणांनी प्राण गमावलेल्या या अपघातासाठी दोषी असलेला अल्पवयीन मुलाचे वडील आहेत. त्यांना बुधवारी शिवाजीनगरमधील कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी युक्तीवादादरम्यान सरकारी पक्षाने विशाल अग्रवालविरोधात बाजू मांडताना चालकाला दिलेल्या सूचनेसंदर्भातील माहिती दिली.


गाडीत होता टेक्निकल फॉल्ट


अपघातग्रस्त गाडीला नंबर प्लेटही नव्हती, असं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विशाल अग्रवालच्या वकिलांनी, या गाडीत बिघाड असल्याने बंगळूरमधील डीलरकडे त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू होता. पण डीलरकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दिल्लीतील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार करण्यात आली होती, अशी माहिती आरोपीच्या वतीने दिली. कोर्टासमोर आरोपीच्या वकिलांनीच ही माहिती दिल्यानंतर, गाडीत बिघाड असताना ती रस्त्यावर आणलीच काही असा प्रश्न न्यायाधिशांनी उपस्थित केला.


नक्की वाचा >> 'पोलीस मृतांच्या नात्याबद्दल..', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'उपमुख्यमंत्री बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी..'


विशाल अग्रवाल चालकाला काय म्हणाला?


या प्रकरणात पुणे पोलिसांनी अपघात झाला तेव्हा गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या चालकाचा जबाब देखील नोंदवला आहे. त्यामध्ये या चालकाने, "मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे! तू शेजारी बस', अशी सूचना विशाल अग्रवालने दिली होती असं सांगितलं. तसेच चालकाने पोलिसांना, 'अपघात घडला त्या रात्री मी गाडी चालवतो असं मुलाला म्हणालो होतो. मात्र तुम्ही शेजारी बसा मी गाडी चालवतो असं सांगत मुलाने गाडी हातात घेतली," असं जबाब नोंदवताना सांगितलं.


नक्की वाचा >> पुण्यातील अपघाताची देशभर चर्चा; पण 'पोर्शे'चा नेमका अर्थ काय?


कोर्ट म्हणालं, दोन्ही गोष्टी गंभीर


बिघाड असलेली गाडी रस्त्यावर आणण्याबरोबरच चालकाऐवजी मुलाने गाडी चालवणे या दोन्ही गोष्टी गंभीर असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. आरोपी विशाल अग्रवालला कोर्टाच्या आदेशानुसार 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं जाणार आहे.