Pune Porsche Accident Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात आहे. तर दुसरीकडे त्याचे वडिल विशाल अग्रवालला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर आता याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणीनगर अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आणखी एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन कार चालकाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवार यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. तसेच अग्रवाल कुटुंबाविरोधात विरोधात तक्रारी असल्याचे संपर्क साधा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.  


तपास गुन्हे शाखेकडे वर्ग


तसेच आता पुण्यातील कल्याणीनगर या ठिकाणी झालेल्या अपघाताचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे यापुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनकडील तपास गुन्हे शाखेकडे केला जाणार आहे. एसीपी सुनील तांबे हे याप्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत. जवळपास सहा दिवसानंतर तपास हस्तांतरित केला जात आहे. 


नेमकं प्रकरण काय?


दरम्यान रविवारी (19 मे) रोजी पुण्यात एका 17 वर्षाच्या मुलाने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन इंजिनिअर्सना त्याच्या पोर्शे कारने चिरडलं होतं. कार चालवणारा अल्पवयीन दारुच्या नशेत होता. या भीषण रस्ते अपघातात दोन्ही इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. अनिश अवधिया (24 वर्ष) आणि अश्विनी कोष्टा (24 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. हे दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असून पुण्यात कामाला होते. 


या प्रकरणी आरोपीचे वडिल विशाल अग्रवालला 24मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन बाल हक्क न्यायालयाने रद्द केला होता. त्या मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर काल पार पडलेल्या सुनावणीत पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालसह सहा जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजी नगर न्यायालयात ही सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकीलांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.  


पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न 


या प्रकरणात नव नविन खुलासे होत आहेत. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न पुणे अपघात प्रकरणात करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आले. पुरावे नष्ट करणा-याचा प्रयत्न करणा-यांवर कलम 201 लावण्यात येणार आहे. मुलाला वाचवण्यासाठी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न केला गेला असा दावाही पुणे पोलिसांनी केला आहे.