Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी अटक केली आणि तिथं सुरेंद्र अग्रवाल या आरोपीच्या आजोबांच्या घरावर गुन्हे शाखेकडून छापे टाकण्यात आले. सदर प्रकरणी वाहन चालकाला अर्थात ड्रायव्हरला धमकाल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवालवर अटकेची कारवाई केली होती. ज्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी ( 25 मे 2024) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आजोबा आणि वडिलांकडून ड्रायव्हरला आधी आमिष दाखवण्यात आलं असून, नंतर त्याला धमकावल्याची खळबळजनक माहिती सर्वांसमोर आणली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातानंतरच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत ड्रायवरवर सुरेंद्र अग्रवाल आणि अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी दबाव टाकल्यामुळं सुरुवातीला त्यानं खोटा जबाबही नोंदवल्याचं यावेळी उघड करण्यात आलं. या प्रकरणी आरोपींनी ड्रायव्हरला कारमध्ये बसवून घरी आणलं, तिथंच त्याचा फोन काढून घेतला आणि त्याला दोन दिवस घरातच डांबून ठेवलं, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. 


सध्याच्या घडीला पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक आरोपी ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, दुसऱ्या आरोपीच्या कोठडीची मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले. 


हेसुद्धा वाचा : Pune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक


पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीनं ड्रायव्हरवर अपघात अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता. इतकंच नव्हे, तर त्याला डांबून ठेवलं होतं. ड्रायव्हर घरी परतला नाही, त्यामुळं दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचे कुटुंबीय आरोपीच्या घरी गेले आणि तिथं आरडाओरडा केला तेव्हा त्याला तिथून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी ड्रायव्हर अतिशय घाबरलेला आणि दबावाखाली होता. 


या प्रकरणाच्या चौकशीनंतर आरोपींविरुद्ध भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 342, 365 आणि 368 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 


गुन्हा अंगावर घ्या, बक्षीस देऊ... 


'गुन्हा अंगावर घ्या, बक्षीस देऊ, वेगळं काही बोललास तर बघून घेऊ', अशा धमकी ड्रायव्हरला आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.  आपण कार चालवत नसल्याचं ड्रायव्हरनं कबुल केलं असून, दबावतंत्राचा वापर केल्यामुळे मी सुरुवातीला दबावातच जबाब नोंदवला असल्याचंही त्यानं सांगितलं. ही संपूर्ण घटना आणि त्यानंतर मिळालेली वागणूक हा आपल्यासाठी मानसिक धक्का होता, असंही ड्रायव्हरनं पोलिसांकडे सांगितलं.