Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीय. ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले. ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी एका महिलेचे आणि 2 प्रौढ व्यक्तींच्या ब्लडचे सॅम्पल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आरोपीला वाचवण्यासाठी डॉ. हळनोरने हा कारनामा केल्याचं अहवाल चौकशी समितीने दिलाय. तेव्हा ही महिला म्हणजे या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल होत्या का? असा सवाल उपस्थित होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लड सॅम्पल आईचंच? 4 अनोळखी व्यक्ती कोण?


ससूनमध्ये अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल झालीये. डॉक्टर श्रीहरी हळनोरने ब्लड सॅम्पलची अदलाबदल केली. एक महिला आणि दोन प्रौढ व्यक्तींचे ब्लड सॅम्पल घेतले. ती महिला या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल होत्या का? शिवानी अग्रवाल यांच्या ब्लडचं सॅम्पल घेणार का? असा सवाल आता विचारला जातोय. 19 मे रोजी डॉक्टर श्रीहरी हळनोरने आरोपीचे ब्लड सॅम्पल घेतले होते. 4 अनोळखी व्यक्तींनी ससून रुग्णालयात प्रवेश केला. बाहेरुन आलेल्या या चौघांनी डॉक्टरवर दबाव टाकत सॅम्पल बदलल्याचा आरोप करण्यात आलाय. अजय तावरेनेही ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा जबाब डॉक्टर श्रीहरी हळनोर यानेही दिलाय.
 
आता शिवानी अग्रवाल यांचं ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर ती महिला नक्की कोण हे स्पष्ट होणार आहे. शिवानी अग्रवाल यामध्ये दोषी आढळल्यास त्यांनाही तपासासाठी अटक केली जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास अग्रवालांचं संपूर्ण कुटुंबच जेलमध्ये जाईल. मात्र या ब्लड सॅम्पलच्या अदलाबदलीत महत्त्वाची भूमिका बजावली ती ससूनच्या डॉक्टर श्रीहरी हळनोरने... तावरेच्या सांगण्यावरुन त्याने अदलाबदली केली. मात्र ससून रुग्णालयातल्या नाही तर बाहेरच्या लोकांनी आता येऊन रक्ताचे नमुने बदलल्याचाही आरोप करण्यात आलाय.


काय म्हणाला डॉ. श्रीहरी हळनोर?


डॉ. अजय तावरेंनी ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला. ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करणं मनाला पटलं नाही. माझ्याकडून ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करवून घेण्यात आला. फेरफार केल्यामुळे 2 दिवस मला झोप आली नसल्याची माहिती हळनोरने पोलिसांना दिलीय. मात्र हे ब्लड सॅम्पल घेताना ससूनच्या सीसीटीव्हीमध्ये आणखी काही जणांच्या हालचाली दिसत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय. तसंच या गुन्ह्यात मुलाच्या वडिलांचा सहभाग दिसून येत असल्याचंही त्यांनी कोर्टात म्हटलंय. यातही धक्कादायक खुलासा समोर आलाय.


डॉक्टर हळनोरने रक्ताच्या सिरिंज कचरा पेटीत न टाकता कुणालातरी दिल्या. मुलाचे रक्त सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी घेण्यात आलं. मात्र त्या महिलेचे रक्त मुख्य वैद्यकीय अधिका-याच्या खोलीत ठेवलं. महिलेच्या रक्ताचे नमुने जिथे घेतले तिथे सीसीटीव्ही नसल्याचं समोर आलंय. दरम्यान, ससूनमध्ये आलेल्या व्यक्तींनी दबाव टाकला. त्यामुळेच हळनोर याने सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन तिघांच्या रक्ताचे नमुने घेतले. यातला एक नमुना अल्पवयीन आरोपीच्या आईचा होता. मात्र शिवानी अग्रवाल यांचा कुठेही थांगपत्ता लागत नाहीये. त्या नक्की कुठे गायब झाल्या याचा शोध सुरु आहे. एवढं नाही तर त्यांचा फोनही बंद असल्याने आता पोलिसांना कसरत करावी लागतीये.