पुणे कार अपघातात (Pune Car Accident) प्रकरणी पोलिसांनी चालक मुलाचे वडील विशाल अग्रवालला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दुसरीकडे चालक मुलाला सज्ञान ठरवण्यासाठी बाल न्याय हक्क मंडळाकडे पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या अर्जावर निर्णय अपेक्षित आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अग्रवाल कुटुंबाचे छोटा राजनशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार अपघातातील मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. संपत्तीच्या वादातून भावाविरुद्धच वाद सुरू आहे. यात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी थेट छोटा राजनकडून मदत घेतल्याचा आरोप आहे. विशाल अग्रवाल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


तसंच पुण्यात त्यांची मित्रासह भागीदारी होती. मात्र संपत्तीच्या वादातून मित्रावर गोळीबर झाला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यातही छोटा राजनचा हात असल्याचं सांगितलं जात आहे.  


पुणे अपघात प्रकरणात आज काय होणार ?


चालक मुलाचे वडील विशाल अग्रवालला आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यावेळी पोलिसांकडून कोठडीची मागणी केली जाऊ शकते. दुसरीकडे चालक अल्पवयीन असल्याने त्याला सज्ञान ठरवण्यासाठी बाल न्याय हक्क मंडळाकडे पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या अर्जावर निर्णय अपेक्षित आहे. 


तसंच चालक मुलाचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल अपेक्षित असून त्यातून त्याने मद्यप्राशन केले होते का? याबाबतचा अधिकृत खुलासा होणार आहे. याशिवाय घटनेसाठी कारणीभूत इतर खासगी तसंच सरकारी व्यक्तींवर बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल कारवाई अपेक्षित आहे. 


प्रौढ म्हणून कारवाई कऱण्याची पोलिसांची मागणी


"आम्ही 304 सह संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल करत कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. चालकाला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं असं आम्ही अर्जात सांगितलं होतं. कोर्टाने हा अर्ज फेटाळला होता. त्यावर आम्ही जिल्हा न्यायालयात अपील केली आहे. आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. आमची पूर्ण ताकदीने कायदेशीर लढण्याची तयारी आहे," असं पोलीस आयुक्तांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.