... तर अगरवाल दाम्पत्य परदेशात फरार होईल; पोलिसांनी कोर्टाला सांगितली महत्त्वाची माहिती
Porsche Crash Case: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येत आहे. अगरवाल दाम्पत्याला जामीन देऊ नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
Pune Porsche Crash Case: पोर्श अपघात प्रकरणात पुन्हा एक नवीन घडामोड समोर येत आहे. अगरवाल दाम्पत्याला जामीन दिल्यास परदेशात प्रसार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं आरोपीचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती तपास अधिकारी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सोमवारी न्यायालयात केली.
पुण्यातील पोर्श कार अपघातप्रकरणानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. रविवारी 19 मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यपान करुन नशेत पोर्श कार चालवत दोघा जणांना धडक दिली होती. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. तर, मुलाचे वडिल आणि उद्योजक विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर, मुलाची आई आणि आजोबा दोघांनाही अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. मात्र अगरवाल दाम्पत्याच्या जामीनास विरोध करण्यात आला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अगरवाल दाम्पत्य धनाढ्य आहे. त्यांना जामीन मंजूर केल्यास ते नीरव मोदी, विजय मल्ल्याप्रमाणे परदेशात पसार होतील. आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्या यावा, अशी विनंती तपास अधिकारी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सोमवारी न्यायालयात केली. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी जामीन अर्जावरील यु्क्तिवाद पूर्ण केला. ॲड. हिरे यांनी आरोपींच्या जामीन अर्जास विरोध केला.
आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी धनाढ्य आहेत. अपघातानंतर मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी त्यांनी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अश्फाक इनामदाकर, अमर गायकवाड यांच्यामार्फत पैसे दिले. पोर्शे अपघात प्रकरणात सहा साक्षीदार आहे. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते साक्षीदारांना धमकावतील. अगरवाल दाम्पत्याला जामीन मंजूर केल्यास ते नीरव मोदी, विजय मल्ल्याप्रमाणे परदेशात पसार होण्याची शक्यता आहे, असे सहायक आयुक्त गणेश इंगळे यांनी न्यायालयात सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे.