Pune Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांवर अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण गाजल्यानंतर पोलिसांनी मुलाचे वडील विशाल अग्रवालला (Vishal Agrawal) अटक केली. या अपघातात निर्दोष तरुण-तरुणीचा बळी गेला. अपघातातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत तरुण-तरुणीच्या पालकांनी केलीय. पोर्शे कार अपघातातील मृत तरुणी ही मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये राहाणारी होती. मृत मुलीचं नाव अश्विनी कोष्टा (Ashwini Kosta) असं होतं, अश्विनिला प्रेमाने तिच्या घरचे आशी बोलायचे. जबलपूरच्या ग्वारीघाट मुक्तीधाममध्ये अश्विनीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनी कोष्टा जबलपूरच्या साकार हिल्स कॉलनीत राहात होती, आणि कामानिमित्ताने ती पुणे मेम जॉनसन कंट्रोल्स कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. 


अश्विनीच्या आईने फोडला हंबरडा
अश्विनीच्या मृत्यूची बातमी ऐकताच तिच्या आईने हंबरडा फोडला. मुलीचं लग्न करुन तिची पाठवणी करण्याऐवजी तिचा मृतदेह उचलण्याची वेळ तिच्या आई-वडिलांवर आली. अश्विनीच्या अचानक जाण्याने ती राहात असलेल्या परिसरातही दु:खाचं वातावरण आहे. माझी मुलगी लाखात एक होती, तिची काय चूक होती, असा सवाल अश्विनी विचारतेय.


अश्विनी अभ्यासात हुशार
अश्विनी अभ्यासात हुशार होती आणि तीने खूप स्वप्न पाहिली होती. आयु्ष्यात खूप मोठं व्हायचं ध्येय तीने बाळगलं होतं. पण एका श्रीमंत मुलाच्या चुकीने अश्विनीचं स्वप्न अपूर्णच राहिलं. अश्विनीच्या आई-वडिलांनी दोषींवर कठोर कारावाई करावी अशी मागणी केली आहे.


अश्विनीला न्याय हवा
अश्विनीचा भाऊ आपल्या प्रिय बहिणीच्या मृत्यूने पुरता खचला आहे. अश्विनी फक्त 24 वर्षांची होती आणि जग सोडून जाण्याचं तिचं वय नव्हतं. माझ्या बहिणीला न्याय मिळायला हवां. दोषींना त्यांच्या चुकीची कठोर शिक्षा मिळायलाच हवी, जेणेकरुन भविष्यात इतरांच्या मुला-मुलींबरोबर असं होऊ नये अशी अपेक्षा तिच्या भावाने व्यक्त केली आहे. 


अश्विनीच्या कुटुंबियाने न्यायाची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलाला कार देणारे त्याचे पालक आणि दारु देणाऱ्या पबवर कारवाई व्हावी अशी मागणीही तिच्या पालकांनी केलीय. वेगाने कार चालवणाऱ्यांवर, दारु पिऊन कार चालवण्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.


पबवर पालिकेची कारवाई
दरम्यान, या घटनेनंतर  पुणे महापालिकेनं कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉटर्स आणि ओरिल्ला पब वर कारवाई केलीये. बुलडोजर जेसीपीच्या साह्याने पब चे बांधकाम पाडण्यात आलं. कोरेगाव परिसरात असलेल्या बेकायदेशीर पब बांधकामावर ही कारवाी करण्यात आली