पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट! कार बनवणाऱ्या कंपनीकडून आला खुलासा, अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढणार
Pune Porshe Car Accident: पोर्श कारमध्ये तांत्रिक बिघाड होता, असे अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाने कोर्टात सांगितलं होतं. यावर आता कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
Pune Porshe Car Accident: पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. अल्पवयीन मुलाना 300 शब्दांचा निबंध लिहायला लावल्याची शिक्षा दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आणि याची देशभरात वाच्यता झाली. दरम्यान पोलीस, रुग्णालय, कोर्ट सर्व आस्थापनांतून अग्रवाल कुटुंबाला सहकार्य झाल्याचे उघड होतंय. पोर्श कारमध्ये तांत्रिक बिघाड होता, असे अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाने कोर्टात सांगितलं होतं. यावर आता कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
अपघातग्रस्त कारमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता असा दावा पोर्श कंपनीने केलाय...पोर्श कंपनीच्या पथकाने कारची तपासणी करून तांत्रिक अहवाल येरवडा पोलिसांना सुपूर्द केलाय...गाडीमधील लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची देखील तपासणी करण्यात आली.
कंपनीच्या प्रतिनिधींनी येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन गाडीची तपासणी केली...गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबीयांची तक्रार होती...मात्र, बिघाड नसल्याचं कंपनीच्या अहवालातून समोर आलंय.
आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली
पुणे पोलिसांकडून पोर्शे अपघात प्रकरणी चौकशी केली जात आहे. आज गुन्हे शाखेकडून मुलासमोर आईची चौकशी कऱण्यात आली. यावेळी सुरुवातीला शिवानी अग्रवालने उडवाउडवीची उत्तरं दिली. दरम्यान कठोरपणे चौकशी केली असता अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या जागी आपलं रक्त दिल्याची कबुली शिवानी अग्रवालने दिली आहे. आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल दोघांनी मिळून हा कट रचला होता.शिवानी आणि विशाल हे दोघे ही ससून रुग्णालयात अपघातादिवशी उपस्थित होते. ससूनच्या सीसीटीव्हीत विशाल अग्रवालही आढळला होता. दरम्यान माझा मुलगाच गाडी चालवत होता, याचीही आई-वडिलांनी चौकशीत कबुली दिली आहे.
नेमकी घटना काय?
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने 19 मे रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी चालकाला चोप दिला. दरम्यान घटनास्थळावरचं एक सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये कार किती वेगात होती हे स्पष्टपणे दिसत आहे.
या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 15 तासातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मंजूर करताना निबंध लिहिण्याची अट घातल्याने संताप व्यक्त झाला होता.