Maharashtra Politics : पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak Award) सोहळ्यात मंचावर घडलेल्या या दोन ठळक घटना. यातली पहिली म्हणजे शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान मोदींचा (PM Modi) हात धरून कौतुकानं मारलेली थाप. आणि दुसरी म्हणजे पंतप्रधान मोदींनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) खांद्यावर थाप मारून दिलेली शाबासकी. अॅक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड. म्हणजे शब्दांपेक्षा चित्रं जास्त बोलकी असतात हेच यानिमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. एकमेकांशी काहीही शब्द न बोलता आपल्या कृतीतून जे सांगायचंय ते शरद पवार, नरेंद्र मोदी आणि अजित पवारांनी दाखवून दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार. एकमेकांचे राजकीय विरोधक. सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएच्या विरोधात इंडिया आघाडीची मोट बांधण्यासाठी जोरबैठका सुरू आहेत. अशावेळी इंडिया कॅम्पमधला शरद पवारांनी एनडीएचे सर्वेसर्वा असलेल्या मोदींसोबत एकाच व्यासपीठावर हजेरी लावल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. मात्र  पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. 


कार्यक्रमासाठी मोदी स्टेजवर आले तेव्हा ते पवारांशी हसून बोलले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला, मग हस्तांदोलन केलं, मोदी हास्यविनोद करत पवारांशी काहीतरी बोलले. पवारांनीही त्याला हसून दाद दिली. शरद पवारांनी मोदींच्या खांद्याला हात धरुन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर पवारांनी मोदींच्या पाठीवर थापही मारली. या कार्यक्रमात शरद पवार आणि मोदी एकमेकांना उद्देशून काय बोलतात, ते ऐकण्यासाठी सगळ्यांचेच कान टवकारले होते. मात्र भाषणाच्या शेवटी शेवटी पवारांनी एका ओळीत नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं.


मविआत अस्वस्था
पवार आणि मोदी एकाच मंचावर आल्यानं मविआतली अस्वस्थता मात्र कायम आहे. पवारांनी याबाबत संभ्रम दूर करावा अशी मागणीच आता काँग्रेसनं केलीय.  कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरुन उतरण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनाही मोदींनी नमस्कार केला. त्यावेळी मोदींनी शिंदे आणि फडणवीसांना नमस्कार केला. मात्र अजित पवारांच्या खांद्यावर थाप मारली. मोदींनी अजित पवारांच्या खांद्यावर मारलेली ही थाप लक्षवेधी ठरली... 


अगदी महिनाभरापूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस ही भ्रष्टाचारी पार्टी असल्याची जोरदार टीका केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. तर पुण्यामध्ये मोदी-पवारांची ही जाहीर भेट... पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, हेच यानिमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालं.