पुण्यामध्ये होऊ घातलेल्या जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली असतानच पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडली आहे. पुणे रेल्वे स्थानकाची आज सकाळपासून कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर रेल्वे स्थानकामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर स्थानकातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. तसेच पुणे स्थानकामध्ये संशयास्पद वस्तू आहे का यासंदर्भातील तपासणी करण्यात आली. तसेच सर्व प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकाची श्वानपथकाच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जी-20 परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून त्यातील 4 बैठका पुण्यात पार पडणार आहे. त्यापैकी पहिली बैठक ही 16 आणि 17 जानेवारी रोजी पार पडणार आहे. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शुशोभिकरणाबरोबरच सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आली आहे. असं असतानाच आज सकाळी पुणे रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडली. एका निनावी फोनवरुन ही धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी केली जात आहे. डॉग स्कॉडच्या मदतीने संपूर्ण रेल्वे स्थानकाची तपासणी केली जात आहे.


मनमाडमधून आलेला फोन


पुणे स्थानक उडवून देण्याची धमकी देणारा फोन हा मनमाडमधून आल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांची एक टीम या व्यक्तीला अटक करण्यासाठी मनमाडला रवाना झाली आहे. ही व्यक्ती कोण आहे तिने असा फोन का केला यासंदर्भातील माहिती आता पुढील कारवाईनंतरच समोर येईल.


महाराष्ट्रात जी-20 च्या एकूण 14 बैठकी


जी-20 च्या एकूण 14 बैठकी महाराष्ट्रात होणार आहेत. यापैकी 8 बैठका या मुंबईत पार पडणार आहे. त्याशिवाय पुण्यात 4 तर नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकांचे नियोजन योग्य व्हावे, यासाठी राज्याचे प्रधान सचिव आणि राजशिष्टाचार विभागाच्या अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य सचिव स्तरावरही देखरेखीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.