Pune Sarasbaug Ganpati : खरंच बाप्पाला थंडी वाजते? सारसबागेतील गणपतीला स्वेटर घालण्यामागे मोठं कारण
Pune News : सारसबागमधील या गोड बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. पुण्यात थंडी वाढताच सारसबागेतील या गणपतीला स्वेटर, कानटोपी घालण्यात येते. पुणेकर देखील या गणपतीला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यासह पुणे (Pune News) शहरात थंडी (Cold Wave) वाढल्यामुळे तापमानाचा पारा खाली आला आहे. सध्या गुलाबी थंडीचा स्पर्श पुणेकर अनुभवताना दिसत आहेत. दिवसभर स्वेटर (sweater) घालून पुणेकर फिरत आहे. अशा या थंडीत पुण्यातील सारसबाग येथील सिद्धिविनायकाला हुडहुडी भरली आहे. बाप्पाला थंडी वाजू नये म्हणून सिद्धिविनायकाला लोकरीचा स्वेटर, कानटोपी घालण्यात आली आहे. गणपतीचे हे विलोभनिय रूप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणेकरांनी देखील या गणपतीला पाहण्यासाठी गर्दी करत आहे.
बाप्पाला स्वेटर का घालतात?
पुण्यातील सारसबाग येथील मंदिर परिसराची रचना पाहता असे मंदिर भारतात नाही. हिवाळ्यात थंडीचा कडाका जसा वाढतो तसे भाविकांचे फोन येतात आणि प्रिय गणरायाला स्वेटर घातले की नाही अशी विचारपूसही होते. येथील गणेशभक्तांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. देहाला ते देवाला अशी आपल्याकडे म्हण आहे. याप्रमाणेच आपण जसे हिवाळ्यात स्वेटर कानटोपी घातलो तसेच सारसबाग येथील गणपती बाप्पाला हिवाळ्यात लोकरीचे स्वेटर कानटोपी असा पेहराव केला जातो.
50 वर्षांहून जुनी परंपरा
"राज्यात सध्या थंडीचा कडाका आता वाढत असून, सारसबागेतील या सिद्धिविनायकाला स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे बाप्पासाठी भक्तच स्वेटर घेऊन येतात आणि जशी थंडी वाढली की भक्तच आम्हाला सांगतात की बाप्पाला स्वेटर घाला. जवळपास 40 हून अधिक प्रकाराचे स्वेटर भक्तांनी बाप्पासाठी आणले असून ते आम्ही रात्री च्या वेळेस घालतो आणि सकाळी 6 वाजता स्वेटर काढून काढतो. गेल्या 50 हून अधिक वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे, असे देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित यांनी सांगितल.
भाविकांची गर्दी
सारसबाग गणपती मंदिर हे श्री देव देवेश्वर संस्थान, पार्वती आणि कोथरूड यांच्या अधिपत्याखाली चालते. पुण्यातील आणि जगभरातील लाखो भाविकांसाठी हे मंदिर पवित्र भूमी आहे. गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या प्रसंगी येथे दर्शनाला रिघ लागते. नविन वर्षातील ही पहाटेपासून मंदिरात भक्ताच्या रांगा पाहायला मिळतात. तसेच स्वेटर मध्ये बाप्पाचे विलोभनीय रुप पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणत गर्दी करत असतात. इथे येणार काही भक्त तर 20 ते 25 वर्षांपासून दरोरोज बाप्पाची आरती नित्य नियमाने करतात.