पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा अचानक राजीनामा दिला. अजित पवारांच्या या राजीनाम्याबाबात पक्षातल्या कोणत्याच नेत्याला माहिती नाही. खुद्द शरद पवार यांनीही अजित पवारांनी याबाबत आपल्याशी चर्चा केली नसल्याचं सांगितलं. अशा राजकीय पेचप्रसंगातही शरद पवारांचा मिश्किल स्वभाव कायम असल्याचं पुण्यातल्या पत्रकार परिषदेत दिसलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत उदयनराजेंची अक्षरश: विकेट काढली. शरद पवार साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर मी माघार घेईन असं उदयनराजे गहिवरून म्हणाल्याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांच्या मानसिक स्थितीत मी भर टाकू इच्छित नाही, असं पवार म्हणाले.


तसंच उदयनराजेंना दिल्लीमध्ये गाडी बंगला पाहिजे यावर 'मी त्यांना गाडी-बंगला द्यायला तयार आहे, फक्त त्यांनी दिवसा बंगल्यावर यावं,' असा टोमणा शरद पवार यांनी लगावला. तर बारामतीतून लढायला तुम्ही इच्छुक आहात का, असा सवाल त्यांनी झी २४ तासचे प्रतिनिधी अरुण मेहेत्रे यांना केला.


पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा आपण व्यक्त केली असल्याचं शरद पवार म्हणाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातून पवारांनीच निवडणूक रिंगणात उतरावं अशी मागणी केली होती. पण निवडणूक न लढण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं पवारांनी सांगितलं.