अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे :  पुण्यातील सिंहगड कॅालेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं रॉकेट थेट अमेरिकेच्या अवकाशात झेपावणार आहे. अमेरिकेत होऊ घातलेल्या जागतीक पातळीवरील रॉकेट अभियांत्रीकी स्पर्धेसाठी त्यांच्या रॉकेटची निवड झालीय. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या रॉकेटला भारताचे मिसाइल मॅन स्वर्गीय एपीजे अब्दुल कलामांचं नाव देण्यात आलय. 


रॉकेट सुमारे १० हजार फुट उंचीवर पोहोचणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंहगड टेक्निकल इन्सिट्यूटच्या विद्यार्थ्यांची निर्मिती असलेलं एपीजे हे रॉकेट आकाशात उंच भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. सिंहगडची रॉकेटरी टीम लवकरच हे रॉकेट घेऊन अमेरिकेला रवाना होणार आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द बाळगलेले हे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान विषयक कौशल्याचं कसब पाहणा-या अनेक स्पर्धा जागतीक पातळीवर होत असतात. त्यातील एक म्हणजे स्पेसपोर्ट अमेरिका कप ही स्पर्धा...रॉकेट अभियांत्रीकीशी संबंधित ही नामांकित अशी स्पर्धा आहे. १९ ते २३ जून २०१८ दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळालीय. त्यांनी बनवलेलं रॉकेट सुमारे १० हजार फुट उंचीवर पोहोचणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा जिथून झेपावलं तिथेच परतणार आहे.  



देशातील केवळ २ कॉलेजेसना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी


सिंहगड इन्सिट्यूटच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १६ विद्यार्थ्यांनी तब्बल ८ महिन्यांच्या परिश्रमातून या रॉकेटची निर्मिती केलीय. विद्यार्थ्यांच्या या आऊट ऑफ बॉक्स थिंकींगला कॉलेजकडूनही तितकत प्रोत्साहन मिळालय. एपीजे रॉकेटच्या चाचण्यादेखील यशस्वी झाल्या आहेत. यावर्षी देशातील केवळ २ कॉलेजेसना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळालीय. त्यातील एक आपल्या महाराष्ट्रातील आहे. त्यासाठी सिंहगडच्या मावळ्यांना खूप खूप शुभेच्छा !