पुण्यातील राज्य सहकारी संघात जोरदार राडा
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एका संचालकाने रिव्हॉल्वर काढल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.
अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील राज्य सहकारी संघात सकाळी जोरदार राडा झाला. भाजप आमदार प्रविण दरेकर, महेश लांडगे, प्रसाद लाड यांनी संघात धुडगुस घातल्याचा आरोप काँग्रेस - राष्ट्रवादीच्या संचालकांनी केला आहे. तर , काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एका संचालकाने रिव्हॉल्वर काढल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.
राज्य सहकारी संघातील ही दृश्य
संघात ही राडेबाजी तीन भाजप आमदारांनी केल्याचा आरोप होत आहे. प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि महेश लांडगे हे ते तीन आमदार आहेत.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक
संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपला बहुमत नव्हते. त्यामुळे दहशत पसरवून संघांच्या चेअरमनपदाची निवडणूक भाजप आमदारांनी उधळून लावल्याचा आरोप करण्यात येतोय.
दरेकर आणि लाड यांनी आरोप फेटाळले
दरेकर आणि लाड यांनी हे आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या संचालकांपैकी एकाने रिव्हॉल्वर काढले. त्यामुळे गोंधळ झाल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या राडेबाजीमुळं निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. घटनेची माहीती कळाल्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र , अद्याप पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.
इतिहासात प्रथमच अशी राडेबाजी
राज्य सहकारी संघाच्या इतिहासात प्रथमच अशी राडेबाजी झालीय. त्यात भाजपच्या तीन - तीन आमदारांचा सहभाग असल्याचा आरोप होत असल्यानं हे प्रकरण अधीकच गंभीर बनलंय. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी आणि निवडणूक पुन्हा पोलीस बंदोबस्तात व्हावी. अशी मागणी होतेय. ही मागणी मान्य करणं पुन्हा भाजपच्याच हातात आहे. त्यामुळं ही मागणी मान्य होणार यावरही शंकाच आहे.