निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे: चोरीला कधी काय जाईल याचा नेम नाही. अगदी एका पेनापासून ते मौल्यवान गोष्टीपर्यंत चोरीला अनेक गोष्टी जात असल्याचं ऐकलं असेल पण आता एक दगडच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक मिनिटं मनात विचार येईल की दगड कसा चोरीला जाईल. विश्वास ठेवणं कठीण आहे पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये संस्थानच्या काळातील कोरीव दगडांची चोरी झाली आहे.


या घटनेमुळे भोरमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंना धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ तर उडालीच पण चर्चाही रंगली आहे. 


भोर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. अनेक जुने वाडे, ब्रिटिश कालीन पूल, संस्थांन काळातील पाणीपुरवठा करणारे हौद शहरात आहेत. या वास्तूंचं बांधकाम कोरीव दगडांमध्ये झालेलं आहे. मात्र चोरांची या दगडांवर नजर गेली. 


कोणी वाली नसल्यानं हे दगड सर्रास चोरुन नेले जातायेत. एकेकाळचे देखणं वैभव असलेला हा ठेवा शेवटच्या घटका मोजत आहे. लॉकडाऊन काळात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यानी हे कोरीव दगड लांबविले. एवढंच नाहीतर संस्थान काळातील पाण्याच्या टाकीवरही अतिक्रमण करून जागा बळकवण्यात आली आहे. 


ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून दगड चोरांच्या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी होतेय.  


आता चोरीला गेलेले दगड परत मिळवणे हे आव्हान आहे. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रशासनानं गांर्भियानं लक्ष द्यावं, अन्यथा या पुरातन वास्तूंचे असेच लचके तोडले जातील. आणि ही बाब निश्चितच लाजीरवाणी असेल.