पुणे :  Pune Traffic Police two wheeler towing : नो पार्किंगमध्ये उभी असलेली दुचाकी चालकासह उचलण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुरुवारी सायंकाळी नाना पेठेमध्ये ही दुचाकी नो पार्किंगमध्ये उभी होती. त्याचदरम्यान वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅन तिथे आली. कर्मचारी गाडी उचलण्यासाठी धावले तेव्हा गाडीचा चालक गाडीवर बसला. मात्र, वाहतूक पोलिसांनी जे केले ते कमाल होतं, अशी तेथे उपस्थितांनी आपली प्रतिक्रिया दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नो पार्किंगमध्ये दुचाकी उभी करण्यात आली होती, असा दावा कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, कर्मचारी आणि दुचाकी चालक यांच्यात शाब्दीक वाद सुरू असतानाच कर्मचाऱ्यांनी गाडी चालकासहित उचलली आणि टोइंग व्हॅनवर ठेवली. गाडी नो पार्किंगमध्ये नव्हती. तर रस्त्याच्या कडेला उभा होतो, असा दावा दुचाकीचालकने केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती वरिष्ठांनी मागवली आहे.


वाहतुकीला अडथळा ठरणारी बाईक उचलली खरी. मात्र, वाहतूक पोलिसांनी अनोख्या पद्धतीने कारवाई केल्याने बघ्यांची गर्दी झाली शिवाय वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला. काही जण यावेळी मोबाईल हा क्षण टिपण्यासाठी धडपड करत असताना दिसत होता. या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तर काहींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.


दुचाकी चालकासह टोइंग करणे योग्य का?



पुण्यात वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसह टोइंग व्हॅनमध्ये ठेवले. या घटनेनंतर नो-पार्किंगमध्ये गाडी असली तरी कारवाईची ही पद्धत किती योग्य आहे,असा सवाल आता उपस्थित केला आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची करत होती. मात्र, हा कारवाईचा अतिरेक झाला, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.