हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर : तो वीस वर्षांचा तरूण होता. कॉलेजमध्ये शिकता शिकता त्याला एका मोबाईल गेमचं व्यसन लागलं. त्या गेमच्या तो आहारी गेला. एक दिवस त्या गेमनंच त्याचा बळी घेतला. पुण्यातल्या शिरूरमधली ही धक्कादायक घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यातल्या पेरणे फाटा इथला दिवाकर उर्फ संतोष माळ हा वीस वर्षांचा तरूण आता या जगात नाही. वाघोलीमधील बीजेएस महाविद्यालयात संतोष बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. गेल्या काही काळापासून संतोषला ब्लॅक लाईटिंग सुपर हिरो फ्लॅश पँथर या मोबाईल गेमचा नाद लागला होता. दिवसेंदिवस संतोष या गेमच्या आहारी गेला आणि अखेर या गेमनं संतोषचा जीव घेतला.


संतोषनं १८ जुलैला खेळलेला गेम हा अखेरचा ठरला. या गेममध्ये झालेला पराभव त्याच्या इतका जिव्हारी लागला की राहत्या घरीच गळफास घेऊन त्यानं आपली जीवनयात्रा संपवली. 


आत्महत्येनंतर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यात 'अवर सन विल शाईन अगेन, पिंजऱ्यातील ब्लॅक पँथर फ्री झाला, आता कसल्याच बंधनात अडकला नाही, द एंड असा मजकूर आणि कसलासा कोड लिहिलेला आढळला. पोलिसांनी संतोषचा मोबाईल ताब्यात घेतला असून फ्लॅश पँथर किंवा ब्लू व्हेलसारख्या जीवघेण्या गेमपासून पालकांनी मुलांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 


खरं आयुष्य असो किंवा व्हर्च्युअल. पराभव पत्करण्याची मुलांची मानसिकता संपत चालली आहे. त्यामुळं पालकांनी मुलांसाठी अधिक वेळ देणं आणि मुलं काय करतायत याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे.


>