पुण्यात तरुण इंजिनिअरचा अपघाती मृत्यू
सर्वात महत्वाची बाब म्हणजे या इंजीनिअरचा अपघात झाला तेव्हा त्याला कुणीही मदत केली नाही, काहींनी फक्त फोटो आणि व्हिडीओ काढले पण पुढील मदतीसाठी ते तयार झाले नाहीत.
पुणे : पुण्यात तरुण इंजिनिअरचा अपघाती मृत्यू झाला आहे, पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे या इंजीनिअरचा अपघात झाला तेव्हा त्याला कुणीही मदत केली नाही, काहींनी फक्त फोटो आणि व्हिडीओ काढले पण पुढील मदतीसाठी ते तयार झाले नाहीत.
पुण्यात आज सर्वात जास्त संख्या आयटी इंजीनिअर्सची असावी, अशावेळी निदान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या तरूण इंजीनिअरची मदत करावी असं कुणालाही का वाटलं नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वेळेवर मदत न मिळाल्याने या इंजीनिअरला प्राण सोडावा लागला.
‘टॉय’च्या वृत्तानुसार, रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इंजिनीअरला मदत करण्याऐवजी लोकं फक्त त्याचे फोटो काढत होते. सतीश प्रभाकर असं या इंजिनीअरचं नाव आहे. ऑफिसमधून परतत असताना एका अपघातात तो गंभीर जखमी झाला. तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना लोकांनी त्याचे फोटो, व्हि़डीओ काढले पण एकाही व्यक्तीनं त्याला मदतीचा हात दिला नाही.
दरम्यान डॉक्टर कार्तिकराज काथे हे त्याच रस्त्यानं जात असताना त्यांनी सतीशची अवस्था पाहिली, आपल्या गाडीतून त्यांनी सतीषला हॉस्पिटलला नेले, पण उशीर झाल्याने त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.
या विषयी डॉक्टर कार्तिकराज काथे म्हणतात, ‘मी जेव्हा त्या रस्त्यानं जात होतो त्यावेळी मी या मुलाला खाली पडलेलं पाहिलं. त्याच्या शरीरातून बरंच रक्त वाहत होतं. तिथं बरेच लोकं होते काहीजण तर त्याचा व्हिडीओही काढत होते. पण त्याच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही. मी त्याला पाहिलं आणि तात्काळ रुग्णालयात घेऊन गेलो. त्याच्या पोटावर गाडीच्या चाकांचे निशाण दिसत होते. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले पण दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला.’
एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे हिट अॅण्ड रनचं प्रकरण आहे. सध्या पोलीस उपलब्ध असलेलं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. ‘जर तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याचे फोटो काढण्याऐवजी त्याला रुग्णालयात नेलं असतं तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता.’ असंही डॉक्टर काथे यांनी म्हटलं आहे.