परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष, अभियंत्याला लाखोंचा गंडा
नोकरीच्या आमिषाने चक्क अभियंत्याला लुटण्यात आलेय. विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी या अभियंत्याला ऑनलाईनद्वारे ६ लाख ५९ हजार १०० रुपयांना गंडा घातला.
पुणे : नोकरीच्या आमिषाने चक्क अभियंत्याला लुटण्यात आलेय. विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी या अभियंत्याला ऑनलाईनद्वारे ६ लाख ५९ हजार १०० रुपयांना गंडा घातला.
अभियंत्याची फसवणूक झाल्याची घटना सोमवारी तळेगाव येथे उघडकीस आली. या संदर्भात विलास नामदेव नितनवरे (४१) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केलेय.
४ मे २०१७ ते १७ जुलै २०१७ या कालावधीत इम्प्रेस ऑटोमिशन कंपनी सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे भरती सुरु असून तुम्ही इच्छुक असाल तर तुमची माहिती द्या. ही माहिती मेलवर पाठवण्यास सांगितले. त्याप्रमाणे नितनवरे यांनी माहिती पाठवली. त्यानंतर त्यांची सहाय्यक व्यवस्थापक पदावर नियुक्ती झाल्याचा मेल त्यांना पाठविण्यात आला. करारपत्र करुन पुन्हा सविस्तर माहिती पाठविण्यासाठी सांगितले, असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलेय.
एका व्यक्तीने विलास यांना वेळोवेळी नोकरीला जाण्याचा फोन करून पैसे उकळले. भामट्याने त्यांच्याकडून ऑनलाईन एकूण सहा लाख ५९ हजार १०० रुपये उकळले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.