अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या - अजित पवार
या विषयावर अजित पवार यांच्यासह विधानसभेतील इतर आमदारही आक्रमक झाले होते.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, तशी तरतुद कायद्यात करा, अशी मागणी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत यासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी ही मागणी केली.अमली पदार्थांच्या व्यसनांमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. काही विशिष्ट देशांमधून लोक येऊन इथं अमली पदार्थांची विक्री करतात. अशा लोकांना आपल्या देशात येण्यास बंदी घाला, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. या विषयावर अजित पवार यांच्यासह विधानसभेतील इतर आमदारही आक्रमक झाले होते.
राज्यात तरुणांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता हा गंभीर विषय असून गेल्यावर्षी राज्यात 1000 कोटींपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्ज पकडण्यात आल्याचा मुद्दा अजित पवार यांना आज विधानसभेत मांडला. पालक नोकरीवर जात असल्यानं घरात मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसतं, त्यामुळे तरूण मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत अमलीपदार्थांवर आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी केल्या पाहिजेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली. यासाठी राज्य सरकारनं अधिकचा निधी दिला पाहिजे अशी मागणीही पवार यांनी केली.
त्यावर गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी व्यसनाधीतेचं प्रमाण वाढत असल्याचं मान्य करत जिथे २ वर्षांची शिक्षा आहे तिथे १० वर्ष इतकी शिक्षा वाढवण्यात आली असून काही गुन्ह्यांसाठी असेलली १० वर्षांची शिक्षा २० वर्ष इतकी करण्यात आली असल्याची माहिती दिली. तसेच जिथे महाविद्यालयांमध्ये असे प्रकार घडतायंत तिथे साध्या कपड्यातील पोलीस नेमले गेले असल्याचीही माहिती पाटील यांनी दिली. असे प्रकार रोखण्यासाठी विशेष पोलिसांची पथके नेमण्या संदर्भात पोलीस महासंचालकांना पत्र लिहिण्यात आले असून अशी विक्री करणारी दुकानं, पान टपऱ्या तसेच विनादुकान विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी विधानसभेत सांगितले.