आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण :  पावसाळ्यात विषारी तसेच बिन विषारी साप मोठ्या प्रमाणात मानवीवस्तीत भक्ष्याच्या शोधात येत असल्याच्या घटना घडत आहे. अनेकदा मानवीवस्तीत भले मोठे साप आढळल्याच्या घटना समोर आला आहे. असाच काहीसा प्रकार टिटवाळा शहरात घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिटवाळ्यामध्ये रिक्षात भलामोठा अजगर (Python in Rickshaw) येऊन बसल्याची घटना घडली. टिटवाळा शहर परिसरात ही घटना घडली असून अजगराला पाहताच रिक्षा चालकासह प्रवाशांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. रिक्षामध्ये असलेल्या या अजगराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


टिटवाळा परिसरात उभ्या असलेल्या रिक्षामध्ये तब्बल ५ फुटी अजगर शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखत वॉर फाऊंडेशनच्या सर्पमित्राला संपर्क साधला.


या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र सागर म्हात्रे ह्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या अजगराला रिक्षातून पकडून एका ड्रममध्ये बंद केले. अजगराला पडकल्याचे पाहून रिक्षाचालकासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर अजगराला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात देऊन निसर्गच्या सानिध्यात सोडून देण्यात आले आहे.



दरम्यान, आपल्या परिसरात सर्प किंवा इतर काही वन्यजीव आढळल्यास त्यांना मारू नये, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. अशावेळी  प्राणीमित्र किंवा वनविभागाला संपर्क साधावा. तसेच पावसाळ्यात बाहेर फिरताना किंवा कोणत्याही वाहनातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.