योगेश खरे, झी 24 तास, नाशिक: मंदिरांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये पूजा-पाठ आणि विधी करणाऱ्या पुजाऱ्यांकडे हत्यारं सापडायला लागली आहेत.नारायण नागबळी, कालसर्प  पूजा करण्यासाठी येणाऱ्या यजमान मिळावे यासाठी नाशिक शहरात राहणाऱ्या परप्रांतीय पुरोहीतांमध्ये स्पर्धा लागलेली असे .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी रात्री त्र्यंबकेश्वर नगरीत यजमान पळविल्याचे आढळून आल्याने या परप्रांतीय पुरोहीतामध्ये वाद झाला. नाशिक शहरात हिरावाडी परिसरात राहत्या घरी मध्यरात्री हा वाद पुन्हा उफाळून आला. बाचाबाची आणि त्यानंतर हातापाई शिवीगाळ असा वाद वाढत गेला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये मारहाण सुरू झाली. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं. 


बीट मार्शल पोलीस गस्त घालत असताना त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या पुरोहितांना हटकले. हाणामारीत पोलिसांनी हस्तक्षेप केला असता पुरोहितांच्या किया आणि इर्तिगा गाडीत गावठी कट्टा,तलवारी ,चाकू कोयते आणि अकरा जिवंत काडतूसे आढळली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तातडीनं कारवाई केली. 


नाशिक पोलिसांनी कारवाई करत 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. या 7 जणांची वैद्यकीय तपासणी करून सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाकडून सात जणांना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


नाशिकचे त्रंबकेश्वर हे नारायण नागबलीची पुजा करण्यसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी लांबून यजमान येत असतात. या त्र्यंबक नगरीत धार्मिक विधी करण्यासाठी एकेका पुरोहिताला लाखोंची कमाई होते. या कमाईसाठी अनेक वेळेस या नगरीत स्थानिक पांथस्थ आणि परप्रांतीयामध्नये वाद घडून आले आहेत. 
 
याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वीरेंद्र त्रिवेदी, आशिष वीरेंद्र त्रिवेदी, मनीष त्रिवेदी, सुनील तिवारी आकाश त्रिपाठी, अनिकेत तिवारी, सचिन पांडे,  या सर्वाना अटक केलीय. सर्व संशयित नातेवाईक आहेत. त्यांचा पौरोहित्य करण्याचा व्यवसाय आहे. 


नाशिक आणि त्रंबकेश्वर येथे पौरोहित्यचा व्यवसाय करतात असं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं. अनेक तथाकथित पुरोहित बिहार उत्तर प्रदेशातून नाशिकमध्ये स्थायिक झाले आहेत. 


आपल्या भागातील यजमान उत्तर प्रदेशातील पुरोहित आणि ज्योतिषी त्र्यंबकेश्वरला पाठवितात त्यांच्या मध्यस्थीतून हा कारभार हाकला जातो. यातून दररोज लाखोंची उलाढाल नाशिक जिल्ह्यात होत असते.


या बक्कळ कमी मेहनतीच्या कमाईसाठी अशी भांडणे नेहमीच होत आहेत. त्र्यंबकेश्वर पोलिसात हे वाद पोहोचतात मात्र तिथेच संपविले जातात. परिणामी आता पुरोहितांच्या या  टोळ्या गुन्हेगारीकडे वळू लागल्याचं दिसत आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे प्रकर्षाने समोर आलं आहे.


या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात पूजा विधी करणाऱ्या ब्राम्हणवर्गात संतापाची लाट उसळली आहे. त्र्यंबकेश्वर नगरीचे नाव बदनाम होत असल्याने स्थानिक पुरोहित संघ याबाबत आक्रमक झाला आहे.