Rada in Thackeray group at Beed : विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड / ठाकरे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर हात उगारल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. आपणच त्यांना चापट्या लगावल्याचा दावा अप्पासाहेब जाधव यांनी केला होता. हा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता.  मात्र याची गंभीर दखल पक्षाकडून घेण्यात आली. त्यानंतर अप्पासाहेब जाधवांवर ठाकरे गटाकडून कारवाई करण्यात आली आहे. 


पैसे मागितल्याचा गंभीर आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडमधल्या महाप्रबोधन यात्रेआधी ठाकरे गटामध्येच राडा पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैसे मागत असल्यामुळेच अंधारे यांना दोन चापट्या लगावल्यात, अशी कबुली बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांनी दिली. तर कोणतीही मारहाण झाली नाही, असा खुलासा सुषमा अंधारे यांनी केलाय. मात्र ठाकरे गटातल्या या वादामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.


दरम्यान, दुसरीकडे बीडमध्ये सुषमा अंधारे यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी आता शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. बीडमध्ये काल काय घडलं ते खरं हाय का? असा सवाल शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केला आहे. जिकडे राशन तिकडे भाषण असं लोकं म्हणतात ते खरं हाय का, असा बोचरा सवालही वाघमारे यांनी केला आहे. 


हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर आता अप्पासाहेब जाधव काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.  बीडमध्ये 20 मे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सुषमा अंधारे गुरुवारी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या सगळ्या धुमश्चक्रीत वरेकर यांच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या गाडीची काच फोडली होती. यानंतर जाधव यांनी परस्पर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर आगपाखड केली होती. सुषमा अंधारे या बीड जिल्ह्यात खूप दादागिरी करत आहेत, असा आरोप केला.


सुषमा अंधारे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटाची प्रबोधन यात्रा होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यासगळ्या प्रकरणावर भाष्य करणार का, याची उत्सुकता आहे.