कोकणात राडा तर यवतमाळमध्ये सेना, भाजप युती
यवतमाळमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला शिवसेनेने सत्तेबाहेर ठेवले आहे.
यवतमाळ : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच भाजपला ''बर्दाश्त किया है, अब बरबाद करेंगे'' असा इशारा दिला. तर, सिंधुदुर्गमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीवरून भाजप आणि शिवसैनिक आमनेसामने आले. सकाळपासून ही राजकीय धुळवड रंगली असताना यवतमाळमध्ये मात्र, सत्तेसाठी सेना भाजपची युती झालीय.
यवतमाळ जिल्ह्यात सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी संधान साधत काँग्रेसला धोबीपछाड दिलीय. या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला शिवसेनेने सत्तेबाहेर ठेवले आहे.
वणी उपविभागात शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी मुत्सद्दी राजकारण खेळत काँग्रेसच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. मारेगावमध्ये काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला व मनसेशी युती केल्याने पक्षात बंडखोरी झाली. काँग्रेसचे दोन नगरसेवक मतदानाला अनुपस्थित राहिले. त्यामुळे भाजपच्या साथीने शिवसेनेचे डॉ. मनीष मस्की नगराध्यक्षपदी निवडणूक आले.
झरीजामनीमध्ये शिवसेनेने जंगोम दल व भाजपशी युती करून काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. शिवसेनेच्या ज्योती बीजगुणवार येथे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.
महागावमध्येही भाजप सेनेची युती होऊन सेनेच्या करुणा शीरबीरे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.
बाभूळगावमध्ये शिवसेनेच्या संगीता मालखुरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. याशिवाय कळंबमध्ये काँग्रेसच्या अफरोज बेगम फारुख सिद्दीकी तर राळेगावमध्ये बहुमतामुळे काँग्रेसचे रवींद्र सेराम यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली.
शिवसेनेसोबत दगाफटका करण्याचा काँग्रेसचा डाव लक्षात आल्याने गनिमीकाव्याने शिवसेनेने तीन नगर पंचायतींवर भगवा फडकावला असे शिवसेनेने सांगितले. तर, शिवसेना भाजप हे एका विचारधारेचे पक्ष असल्याने एकत्र आल्याचे भाजपने सांगितले.