राधाकृष्ण विखे-पाटलांना स्वगृही परतण्याचे वेध?
कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेल्या फलकावर विखेंचा भाजपाने दिलेल्या गृहमंत्रीपदाचा उल्लेख करण्यात आलाय.
अहमदनगर: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना आता स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. श्रीरामपूर येथे बुधवारी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, कार्यालयाच्या फलकावर राधाकृष्ण विखे-पाटीला यांच्या नावापुढे केवळ माजी गृहनिर्माण मंत्री एवढाच उल्लेख आहे. याशिवाय, फलकावर पक्षाचे चिन्ह किंवा शीर्षस्थ नेत्यांचा फोटोही लावण्यात आलेला नाही. त्यामुळे विखे-पाटील भाजपची साथ सोडणार का, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
काँग्रेसचे विरोधीपक्ष नेतेपद सोडून भाजपाच्या गोटात राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले होते. यानंतर आमदार नसतानाही विखे पाटलांना भाजपाने मंत्री पद दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे-पाटील पक्षाला फारसे यश मिळवून देऊ शकले नाहीत. अशातच भाजपची सत्ता गेल्याने विखे-पाटील यांच्या मंत्रिपदाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील सत्तेपासून पुन्हा एकदा दुरावले आहेत.
या पार्श्वभूमवीर विखेंनी आता शिर्डीजवळ असलेल्या श्रीरामपूर मतदारसंघावर आपली पकड मजबुत ठेवण्यासाठी लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने सोमवारी श्रीरामपूरमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेल्या फलकावर विखेंचा भाजपाने दिलेल्या गृहमंत्रीपदाचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र, त्यावर पक्षाचे चिन्ह नाही. उदघाटनाच्या कार्यक्रमाच्या फलकावरही राधाकृष्ण विखे पाटलांचे आजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि वडील बाळासाहेब विखे यांचा आणि राधाकृष्ण विखे या तिघांचाच फोटो होता. त्यामुळे विखे पाटील पुन्हा एकदा यू टर्न मारण्याच्या तयारीत आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे.