राफेल विमान : मोदी यांनी देशाची डिफेन्स सिस्टीम कमकुवत केली - आंबेडकर
राफेल प्रश्नावर भाजप आणि काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे.
लातूर : राफेल प्रश्नावर भाजप आणि काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राफेल विमानांची खरेदी करून तसेच रिलायन्स कंपनीच्या नादी लागून देशाची डिफेन्स सिस्टीम कमकुवत केली आहे, असा थेट आरोप भारिप बहुजन तथा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
राफेलची विमान 'रेडी टू युज' मध्ये राहतील याची कसलीच गॅरेंटी नाही. त्यामुळे युद्धकाळात राफेलच्या विमानांमध्ये बिघाड झाल्यास किंवा काही स्पेअर पार्टची गरज लागल्यास ती कोण उपलब्ध करणार, हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. जर युद्ध काळात असा प्रसंग आल्यास ३६ हजार कोटींची राफेलची विमाने ही कचऱ्याच्या डब्ब्यात टाकावी लागतील, अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे आघाडीसाठी आम्ही प्रस्ताव दिला होता. मात्र त्याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्यामुळे आम्हीही तयारीला लागलो आहोत, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.