`ट्रक आणि ओला चालकांना का नाही..`; Pune Porsche Accident प्रकरणी राहुल गांधींचा रोखठोक सवाल
Rahul Gandhi On Pune Porsche Accident: पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणावर आता थेट काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी आपलं मत नोंदवलं असून एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.
Rahul Gandhi On Pune Porsche Accident: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या पोर्शे गाडीच्या अपघातासंदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवली. आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींनी या प्रकरणामध्ये कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधींनी कारचालक अल्पवयीन मुलाला निबंध लिहायची शिक्षा दिल्याचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. "श्रीमंत आणि गरिबांसाठी न्याय हा समान हवा," असं राहुल गांधींनी निबंधाचा उल्लेख करत म्हटलं आहे.
'ओला, उबर, ट्रकचालकांकडून अपघात झाला तर..'
"जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना 10 वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. मात्र 16 ते 17 वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातं. ट्रक आणि ओला चालकांना का नाही अषी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात?" असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. "न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लाढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा," असं राहुल गांधींनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.
फडणवीस म्हणाले, कठोर कारवाईचे आदेश
राहुल गांधींनी हा व्हिडीओ पोस्ट करण्याच्या काही तास आधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी या प्रकरणासंदर्भात चर्चा केली. बालन्यायलय मंडळाचा निकाल धक्कादायक असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या सर्वांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून या अल्पवयीन मुलाला विशेष वागणूक देण्यात आली असेल तर अशी वागणूक देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर कोणी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्याविरोधातही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असं फडणवीस म्हणाले.
48 हजारांचं बील
या प्रकरणामध्ये संभाजीनगरमधून पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी ज्या पब आणि बारमध्ये या अल्पवयीन मुलाने मद्यपान केलं त्याच्या मालकांनाही ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांनी हा बार आणि पबही सील केला आहे. या बार आणि पबमध्ये अपघाताच्या काही तास आधी अल्पवीयन मुलाने त्याच्या मित्रांबरोबर मद्य आणि खाद्य पदार्थांवर तब्बल 48 हजार रुपये खर्च केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये सामाजिक संस्था तसेच राजकीय दबाव वाढत असल्याने या प्रकरणातील चौकशीला वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.